अंबेजोगाई : गोधन कमी होत असताना, नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे सर्वत्र पसरलेले प्लास्टीक व शिळ्या अन्नाच्या सेवनामुळे जनावरांना विषबाधा होऊन मृत्युमुखी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गायी व वासरे चाऱ्याच्या शोधात गावात भटकंती करीत असतात. शेतातील चाऱ्यावर अनेक वर्षांपासून तणनाशक फवारणीमुळे होत असल्याने चाऱ्याचा प्रश्न ज्वलंत झाला आहे. शेतात चारा नसल्यामुळे गायी, वासरांनी आपला मोर्चा घरोघरी वळविला आहे. प्रत्येक घरी गायी वासराला शिळे अन्न खाऊ घालून गो-पूजा केल्याचे समाधान मिळते, परंतु याच अन्नातून विषबाधा होत असल्याने गुरांचा मृत्यू होण्याच्या घटनात मोठी वाढ झाली आहे. त्यातच प्लास्टीकबंदी असतानाही खुलेआम प्लास्टीक पिशव्या सर्वत्र आढळून येतात. उपयोग झाल्यावर त्या रस्त्यात कुठेही फेकल्या जातात. मुके जनावरे भुकेच्या व्याकुळतेने प्लास्टीकही खातात.
नागरिकांनी गो-पूजनाच्या नावाखाली गायींना अन्नाऐवजी चाऱ्याचा घास खाऊ घालावा. रस्त्यात कुठेही प्लास्टीक दिसले, तर ते उचलून नष्ट करावे, जेणेकरून जनावरांचे जीव वाचविण्यात मदत करावी, असे आवाहन पशुपालकांनी केले आहे.