लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : येथील जुन्या माजलगाव भागातील अनिल लिंबगावकर यांच्या घरातील लोकांना चाकूचा धाक दाखवून दागिने व रोख रक्कम असा तीन लाख रूपयांचा तर याच भागातील अनिल पुरबूज यांच्या घरातून आठ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटना बुधवारी मध्यरात्री घडल्या. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहर व तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील जुना डाकबंगला रोडवर अनिल उर्फ काशीनाथ गोविंदराव लिंबगावकर यांचा घर आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पाठीमागील बाजूने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी प्रथम स्वयंपाक घराला लागून असलेल्या बैठकीतील कपाट फोडले. त्यातील त्यांनी नगदी चार ते पाच हजार हस्तगत केलके. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा वरच्या मजल्याकडे वळविला. वरच्या मजल्यावर अनिल लिंबगावकर त्यांची पत्नी, विवाहित मुलगी व नातू हे झोपलेले होते.चोरांची चाहूल लागताच हे लोक जागे झाले परंतु काही कळण्याच्या आतच त्यांनी दार जोराने ढकलून आत प्रवेश केला. अनिल व त्यांच्या मुलीच्या गळयाला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ते घाबरले. त्यानंतर चोरट्यांनी पध्दतशीरपणे त्यांना गॅलरीत नेवून विवाहित मुलीच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले.
तिच्या हातातील असलेल्या पाटल्या या सहजासहजी निघत नसल्याचे पाहून चोरटयांनी तिच्या बांगडया फोडल्या व नंतर कटरच्या सहाय्याने हातातील पाटल्या कट करु न काढून घेतल्या. त्यानंतर चोरट्यांनी पुढच्या रूममध्ये प्रवेश करीत जुने कपाट तोडून त्यातील पारंपरिक चांदीचे ताट, अत्तरदाणी, वाट्या आदी ऐवजचोरु न चोरटे पसार झाले.
सदर चोरीच्या घटनेत घरातील लोकांना विचारणा केली असता सुमारे ३० ते ३५ तोळे सोने व इतर वस्तू चोरी गेल्याचे सांगितले. ही घटना घडण्यापूर्वी चोरटे हे जुना तहसील रोडवरील अनिल पुरबुज यांच्या घरी गेले होते त्यात त्यांनी नगदी रक्कम व सोन्याचे मणी मंगळसूत्र यासह ७ ते ८ हजाराचा माल लंपास केला. माजलगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरणमागील दोन महिन्यांच्या कालावधीत माजलगाव शहर व तालुक्यात वारंवार घडत असलेल्या चोरीच्या घटना पाहता चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीडमध्ये महिला वकिलाचे दागिने लंपासबीड शहरातील सराफा लाईन भागात राहणाऱ्या अॅड. पूजा शहाणे यांच्या गळ्यातील सोने व दोन मोबाईल असा ३२ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. पडक्या वाड्यातून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, ठसेतज्ज्ञ व इतर पथकांनी भेट देऊन पाहणी केली. बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.