तोकमत न्यूज नेटवर्क
घाटनांदूर : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प असल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्वी अडचणीत आले आहेत. तरी सर्व बाजार समितीचे व्यवहार सुरू करावेत, अशी मागणी अंबाजोगाई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोविंद देशमुख यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्याच्या शेतीमालाची मापे घेणे, शेतीमाल विक्री करणे असे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. शेतकरी मान्सून पूर्व मशागतीचे सर्व शेती कामे संपवून पेरणीच्या तयारीत आहेत. पेरणीकरिता शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीस परवानगी मिळणे गरजेचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी किमान चार ते पाच तासाचा वेळ लॉकडाऊनमधून देणे गरजेचे आहे. तरच शेतकरी खत बी बियाणे खरेदी करू शकणार आहेत. यापूर्वी पणन संचालक यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्याबाबत आदेश काढलेले आहेत, असेही देशमुख निवेदनात म्हटले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना निवेदन दिले आहे.
....
शेतकऱ्याच्या हितासाठी बाजार समिती खुली करण्याची परवानगी आल्यानंतर बाजार समितीकडून कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन व वेळेचे बंधन पाळले जाईल. कर्मचारी, व्यापारी, शेतकरी, हमालमापाडी यांना मास्क व सॅनिटायझर बंधनकारक करुन परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येईल.
-गोविंद देशमुख, सभापती, अंबाजोगाई बाजार समिती.