अंबाजोगाई : लजिल्ह्याती कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन एकाच शहरातील कोविड सेंटरवरील ताण कमी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेता केज, माजलगाव आणि परळी उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची व ऑक्सिजनची तसेच व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे. आवश्यक तेवढे बेड तसेच तज्ज्ञ डॉक्टर्स व इतर आवश्यक स्टाफही उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयांच्या इमारतीत कोरोना रुग्णांची सोय करून कोविड रुग्णालय (इतर आजारांच्या रुग्णांसाठी बेड ठेवून) सुरू करावे जेणे करून रुग्णांना बेड उपलब्ध होतील. तसेच तज्ज्ञ डॉक्टर्सच्या माध्यमातून अत्यावश्यक आरोग्य सुविधाही उपलब्ध होतील.
या मागणीचा गांभीर्याने विचार करून त्वरित योग्य ते आदेश काढण्यात यावेत, अशी मागणी आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केली आहे.
वीजपुरवठ्यात व्यत्यय
अंबाजोगाई येथील वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र आणि स्त्री रुग्णालय, लोखंडी सावरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाचा परिसर मोठा आहे. परंतु या रुग्णालयाला इलेक्ट्रिशियन नाही. दोन दिवसांपासून रात्रभर अर्ध्या इमारतीचा विद्युत पुरवठा बंद होतो व आताही बंद आहे. या दोन्ही सेंटरमध्ये विजेच्या छोट्या-मोठ्या समस्या आल्यातरी इलेक्ट्रिशियन नसल्यामुळे मोठ्या अडचणी येत आहेत.
सध्या दोन्ही कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दोन्ही कोविड रुग्णालयात दोन इलेक्ट्रिशियनची त्वरित नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही आ. नमिता मुंदडा यांनी केली आहे.