यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या औरंगाबाद परिसरात सुमारे ५००० व उस्मानाबाद उपपरिसरात सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. लसीच्या कमतरतेमुळे शासनास १८-४४ वयाच्या व्यक्तींचे लसीकरण स्थगित करावे लागले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने औरंगाबाद विद्यापीठ परिसर व उस्मानाबाद उपकेंद्र येथे कोविड टेस्टिंग (RTPCR LAB) प्रयोगशाळा गतवर्षी सुरू झाली. त्याचा फायदा रुग्णांना होत आहे.
कोविड साथरोगाविरुद्धच्या लढ्यात आणखी एक पाऊल पुढे टाकून औरंगाबाद परिसरातील विद्यापीठाच्या उपकेंद्रात 'कोविड लसीकरण केंद्र' सुरू करण्यात यावे. विद्यापीठाकडे असलेल्या तांत्रिक सोयी-सुविधा व मनुष्यबळाचा विचार करता हे शक्य आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, लस उत्पादक कंपन्यांना १८-४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी लस खासगी लसीकरण केंद्रांना विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने लसीकरण केंद्र सुरू करून त्यामार्फत विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी स्वतंत्रपणे लस खरेदीसाठी प्रयत्न करावा. या माध्यमातून विद्यापीठ परिसरात व उपपरिसरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केल्यास तो देशातील एक आदर्श प्रयोग होईल. त्याचबरोबर शासनावरील भार कमी करण्यासाठी मदत होऊन विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर लसीकरण होईल, असे डॉ. नरेंद्र काळे यांनी निवेदनात म्हटले आहे.