लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने घेण्यात येत असलेली १५ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेला रविवारी बीडमध्ये सुरूवात झाली. यामध्ये राज्यातील तब्बल ४० संघ सहभागी झाले असून पहिल्याच दिवशी आपल्या कलेच्या माध्यमातून बालकलाकारांनी पे्रक्षकांची मने जिंकली. मनोरंजन आणि भावनिक करून पे्रक्षकांनीही त्यांना डोक्यावर घेतले.
बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी बलभिम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सानप, प्राचार्या डॉ.कांचन परळीकर, डॉ.उज्वला वनवे, ज्येष्ठ नाटककार वामन तावडे, निलांबरी खामकर, स्मिता घारपुरे, समन्वय मुकूंद धुताडमल आदींची प्रमुख उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात उस्मानाबादच्या विद्यानिकेत स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या चिमुकल्यांनी शशिकांत कोकाटे यांनी लिहिलेले ‘भोंदुगिरी’ हे नाटक सादर केले.
यामध्ये सर्वसामान्यांना भोंदू बाबा कशाप्रकारे आपल्या जाळ्यात ओढून अंधश्रद्धेच्या बळावर फसवणूक करतात, याचा उलगडा केला. एवढेच नव्हे तर या भोंदु बाबांचे पडद्यासमोरील आणि त्यामागील रूप काय असते, याचेही उत्कृष्ट सादरीकरण केले. केवळ पैशांसाठी हे भोंदु बाबा सर्वसामान्यांना दोन मंत्र म्हणत गळ घालतात आणि फसवणूक करतात. तसेच अंगारा लावण्याच्या बहाण्याने महिलांशी जवळीक साधण्याचा प्रयत्नही हे बाबा करीत असल्याचे या नाटकातून दाखवून दिले. कधी भावनिक तर कधी मनोरंजनात्मक कला सादर करून चिमुकल्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
रंगमंचावरील माईक सिस्टिममध्ये हवी सुधारणानाट्यगृहात स्टेजवर लटकवलेले माईक अपुरे आहेत. चिमुकल्यांचा आवाज छोटा असतो. त्यात माईक दुर असल्याने तो प्रेक्षकांना येत नाही. याचा फटका प्रेक्षक आणि बालकलाकारांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे माईक व साऊंड सिस्टम दुरूस्तीची गरज आहे. तसेच इतर छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचे पे्रक्षकांनी सांगितले. संयोजकांनीही याची दखल घेणे गरजेचे आहे.