बीड : मराठा आरक्षणासाठी परळीत रविवारी बाराव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरु होते. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिवसभरात आंदोलकांशी दोन वेळा भेट घेऊन चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक मागण्यांबाबत ठाम होते. दरम्यान, धारुर तालुक्यात कारी, गेवराई तालुक्यातील रामपुरी येथे आंदोलन करण्यात आले. लोखंडी सावरगाव ते परळीपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. सोमवारी बीड व धनेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शनिवारी मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे संदेशपत्र घेऊन राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर रविवारी परळीत दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची भेट घेत म्हणणे ऐकून घेतले. मुंबईच्या सर्वपक्षीय बैठकीतील निर्णयाची प्रत त्यांनी आंदोलकांना वाचून दाखवली. या मागण्यांची पूर्तता होत असल्याने मराठा समाज बांधवांनी परळी येथील आपले आंदोलन मागे घ्यावे अशी विनंतीही डॉ. भापकर यांनी केली.
दरम्यान, आमच्या राज्य पातळीवरील समन्वयकांशी तसेच समाज बांधवांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय कळवला जाईल अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. त्यामुळे दुपारी उपजिल्हाधिकारी महेंद्र कांबळे व तहसीलदार शरद झाडके भेटले. मात्र, आंदोलकांनी निर्णयातील मुद्द्यांमध्ये दुरुस्तीची मागणी केली. नंतरही पेच कायम राहिल्याने सायंकाळी पुन्हा विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली.
मात्र, कोणताही निर्णय न झाल्याने सायंकाळी सात वाजता आयुक्त निघून गेले. शासनाचे लेखी पत्र जोपर्यंत समाजाला मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे समन्वयक आबासाहेब पाटील यावेळी म्हणाले. दिवसभरात आंदोलकांना भेटण्यासाठी विविध ठिकाणाहून मराठा समाज बांधव, विविध पदाधिकारी येत होते. यात महिलांचा मोठा सहभाग होता.
बीडमध्ये आज लाक्षणिक उपोषणबीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.या उपोषण आंदोलनात जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवासह समाजाच्या आरक्षण प्रश्नांच्या आंदोलनास पाठींबा देणाऱ्या विविध संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विलास बडगे, दिनकर कदम, दिलीप गोरे, विनोद मुळूक, सुभाष सपकाळ, अॅड. महेश धांडे, भास्कर जाधव, नरसिंग नाईकवाडे, अरूण डाके, विलास विधाते, अॅड. बप्पासाहेब औटे, गणपत डोईफोडे, संजय गव्हाणे, सुधिर भांडवले, काकासाहेब जोगदंड, शेषेराव फावडे, तानाजी कदम, सुनील झोडगे, जीवनराव बजगुडे, सतीष काटे, सिध्देश्वर आर्सूळ, अरूण बोंगाणे, अशोक होके, भारत जगताप, पंजाब शिंदे, अरूण लांडे, सुग्रीव रसाळ, अॅड. विष्णूपंत काळे, विठ्ठल बहीर, मनेश भोसकर, राहूल नवले, गणेश गरूड, राम वाघ, सचिन चव्हाण, रवि शिंदे, नानासाहेब जाधव, नागेश तांबारे, जयराम डावकर आदींनी निवेदनाद्वारे केले आहे.
धनेगाव फाट्यावर आज रास्ता रोकोकेज तालुक्यातील कळंब-अंबाजोगाई राज्य महामार्गावरील दनेगाव फाटा येथे युसूफवडगाव जिल्हा परिषद गटातील पंचेवीस गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ३० जुलै रोजी सकाळी दहा वाजता धनेगाव फाट्यावर सामुहिकरित्या मुंडण, राज्य सरकारचा दशक्रिया विधी व रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.