धारूर : शहरातील कसबा विभागात नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या भागातील रहिवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नगर परिषदेने तत्काळ येथील नाल्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
शहरातील कसबा विभागात बहुतांश भागांमधील नाले जुने झाल्यामुळे त्यामध्ये पाणी जाम होऊन हे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कसबा भागातील जाधव गल्ली येथील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाल्यातील घाण पाणी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना येथून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. नगर परिषदेने लवकरात लवकर या भागातील नाले दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा. तसेच घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, याचीही काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील बऱ्याच भागांमध्ये असे दुर्गंधीयुक्त वातावरण आहे. त्यामुळे लवकरात लवकर नगर परिषदेने शहरातील तुंबलेल्या नाल्यांचे काम हाती घेऊन लोकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी अशोक जगताप, दिनेश गायकवाड आदींनी केली आहे
रस्त्यावरच दुर्गंधीयुक्त पाणी आल्यामुळे मोटरसायकलही तिथून नेता येत नाही. नाले व रस्ता दुरुस्त करून वापरायोग्य करावा, अशी मागणी या भागातील नागरिक दिनेश गायकवाड यांनी केली आहे.