बीड : जिल्ह्यात सध्या कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. परंतु लसीचा तुटवडा जाणवत आहे. ती उपलब्ध करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, आतापर्यंत लस घेतल्यानंतर एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याची नोंद आरोग्य विभागाकडे असून ही बाब जिल्हावासीयांसाठी दिलासा देणारी आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी लसच उपाय असल्याचे दिसते.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९५ हजार ७७५ लाेकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. पैकी १ लाख ६४ हजार ६७३ लोकांनी पहिला डोस घेतला असून, ३१ हजार १०२ लोकांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. तसेच आतापर्यंत १५ हजार ४६७ हेल्थकेअर वर्कर्स, २५ हजार ५४८ फ्रंटलाइन वर्कर्स, ९० हजार १०९ सिनीयर सिटीझन, ३३ हजार ५४९ कोमॉर्बिड आजार असलेल्या लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. ग्रामीण भागातील लसीकरणाचा टक्का ८२ असून, शहरातील ८३ आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही लस घेण्यासाठी लोक पुढे येत असून, आतापर्यंत ८ हजार ४९४ लोकांनी लस घेतली आहे. आता १ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस दिली जाणार आहे.
पहिल्या डोसनंतर जिल्ह्यात केवळ दोन टक्के पॉझिटिव्ह
n पहिला डोस घेतल्यानंतर जिल्ह्यात जवळपास ५० लोक कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. याचा टक्का केवळ २ आहे.
n विशेष म्हणजे पहिला डोस घेतल्यानंतर खुद्द जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार हेदेखील कोरोनाबाधित आढळले होते. त्यांनी थोडे लक्षणे जाणवल्याने ॲन्टिजन तपासणी केली होती. १० दिवसांच्या उपचारानंतर ते कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतले होते.
n डोस घेतला तरी लोकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.
लस महत्त्वाचीच; मृत्यूचा धोका कमी
कोरोना लस पूर्णपणे सुरक्षा देते याचा दावा केला जात नसला तरी डोस घेतल्यानंतर अद्याप एकाही मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झालेली नाही. यावरून लस ही महत्त्वाची असून, सर्वांनी मनातील सर्व गैरसमज दूर करून लस घेणे गरजेचे आहे.
दोन्ही डोस घेतल्यानंतर केवळ बोटावर मोजण्याइतकेच बाधित
कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही जवळपास ५ ते १० लोक बाधित आढळल्याची शक्यता आहे. याची नोंद आरोग्य विभागाकडे वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे दुसरा डोस घेतल्यानंतर डॉक्टरांच्या संघटनेचे एक पदाधिकारीदेखील बाधित आढळले होते. परंतु त्यांना जास्त त्रास झाला नसल्याचे सांगण्यात आले.
सुरुवातीला काही दिवस लोकांच्या मनात गैरसमज होते. परंतु आता ते जवळपास दूर झाल्याने लोक स्वत:हून पुढे येत आहेत. आतापर्यंत तरी दुसरा डोस घेतल्यानंतर एकाही मृत्यूची नोंद आपल्याकडे झालेली नाही. त्यामुळे लस हाच पर्याय असून, सर्वांनी ती घ्यावी.
- डॉ. आर.बी. पवार, डीएचओ, बीड