सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: गेवराईतील गर्भलिंग निदानासाठी मनीषा सानप ही कोडवर्ड वापरत होती. ‘खुरपायला कधी यायचे ते बागाईतदाराला विचारून सांगते..’ (डॉक्टरला विचारून तपासणीला कधी यायचे ते सांगते) असे ती म्हणायची. संजयनगर भागात मनीषा शिवाजी सानप व चंद्रकांत चंदनशिव हे दोघे गर्भलिंग निदान करत असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिस व आरोग्य विभागाने सापळा रचून पर्दाफाश केला.
नातेसंबंध काय?
स्टींगमध्ये प्रतिभा चाटे या रुग्ण बनल्या होत्या. पोलिस कर्मचारी सतीश बहिरवाळ हा त्यांचा भाऊ तर आरोग्य कर्मचारी सुनीता शिंदे या बहीण बनल्या.
गर्भवती महिला पोलिसाचे कौतुक
- या स्टिंगमध्ये सर्वांत महत्त्वाची भूमिका ही गर्भवती असलेल्या महिला पोलिस प्रतिभा चाटे यांची राहिली. हवालदार सतीश बहिरवाळ आणि आरोग्य कर्मचारी सुनीता शिंदे सोबत होत्या.
- १९ वर्षांनंतर गर्भवती राहिल्यानंतरही ‘ड्यूटी फर्स्ट’ म्हणत ‘स्टींग’साठी धाडस दाखविणाऱ्या महिला पोलिसचे कौतुक केले जात आहे.
घाबरू नका, गेवराई आपलीच
- गेवराईत पोहचल्यानंतर मनीषाने पैशांची मागणी केली. चाटे यांनी पैसे बहिणीकडे (सुनीता शिंदे) यांच्याकडे असल्याचे सांगितले.
- पैसे मागताच चालक बनलेले सतीश बहिरवाळ यांनी डोक्याला हात लावला. मंगळसूत्र, अंगठी मोडून पैसे जमा केले आहेत.
- पैसे देऊन तपासणी होईल का? अशी भीती बहिरवाळ यांनी व्यक्त केली.
- माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे काम होऊन जाईल. इथे घाबरायचे काहीच कारण नाही, गेवराई आपलीच आहे.. असे मनीषाने म्हटले.
- मनीषाने महिला पोलिसांकडून ३० तर दुसऱ्या महिलेकडून २५ हजार रुपये घेतले.