धारूर : येथील मुख्यरस्त्यावर असलेल्या हनुमान मंदीरातील मुर्तीचा पंचधातूचा मुखवटा तब्बल ८ महिन्यांनी अंबेवडगाव येथील नदीत आढळून आला आहे. मुख्य बाजारपेठेतील हनुमान मंदिरातील पंचधातूचा हा मुखवटा जवळपास ५ किलो वजनाचा आहे. मागील वर्षी २७ जून २०१९ ला हा मुखवटा चोरीस गेला होता. मुखवटा सापडल्याने भाविकात आनंदव्यक्त केला जात आहे.
शहरातील मुख्यरस्त्यावर असणाऱ्या श्री हनूमान मंदीरातील मूर्तीवरील चांदीचे डोळे असणारा पंचधातूचा मुखवटा २७ जून २०१९ रोजी चोरीस गेला होता. याप्रकरणी धारूर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या घटनेने खळबळ उडून शहरात बंद पाळण्यात आला होता. दरम्यान, हा पंचधातूचा मुखवटा सोमवारी धारूर तेलगाव रस्त्यावरील अंबेवडगाव शेतकरी दत्ताञय घोळवे यांच्या शेतातील गडी रमेश नाईकवाडे यांना येथील पुलाखाली नदीपात्रात एका पिशवीत आढळून आला. यानंतर हा मुखवटा त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केला. प्रभारी पोलीस निरीक्षक केदारनाथ पालवे यांनी मुखवटा धारूर येथील मंदिराचा असल्याचा संशय आला. त्यांनी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून याची खात्री केली. पदाधिकाऱ्यांनी याची ओळख पटवल्याने मुखवटा धारूर येथील मंदिरातीलच असल्याचे स्पष्ट झाले. सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून संस्थानच्या ताब्यात हा मुखवटा देणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पालवे यांनी दिली आहे. तब्बल ८ महिन्यांनी मुखवटा सापडल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विधिवत पूजा करून होणार स्थापना विधीवत पुजा करून हा मुखवटा हनुमान मूर्तीवर बसवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच मुखवट्याचा शोध ज्या शेतमजुरामुळे लागला त्याचा तत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.