माजलगाव (बीड) : अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या बीड, वडवणी, धारुर, परळी तालुक्यातील जमिनींचे पुर्नमुल्यांकन करावे, सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा द्यावा तसेच बाजार भावाच्या सहा पट रक्कम द्यावी या मागण्यांसाठी आज दुपारी तेलगाव चौफळा येथे शेतकरी रेल्वे संघर्ष कृती समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी संपादित केलेल्या काही जमिनी ह्या कुंडलिका व अप्पर कुंडलिका धरणाच्या सिंचन खालील येत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना निजामकालीन मावेजा दिला आहे. वास्तविक पाहता या भागातील जमिनीचा बाजार भाव लाखोच्या घरात आहे यामुळे या जमिनींचे फेर मुल्यांकन करावे अशी मागणी शेतकरी व रेल्वे संघर्ष समिती यांनी केली. तसेच मावेजा सन 2003 च्या सुधारित कायद्यानुसार मावेजा देण्यात यावा व बाजार भावाच्या सहा पट रक्कम देण्यात यावी व कुटुंबातील एका व्यक्तीस रेल्वे विभागात नौकरीस घ्यावे अशा मागण्याही आंदोलकांनी यावेळी केल्या. आंदोलनाने जवळपास दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही सततचा दुष्काळ आणि त्यात तुटपुंजा मावेजा यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. वडवणी येथील शेतकरी मनोहर लक्ष्मण पतंगे या शेतकऱ्याचा रेल्वेचा योग्य मावेजा मिळत नसल्या संबंधीच्या धास्तीने ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले तरी सुध्दा संबंधित अधिकाऱ्याने याची कुठलीही दखल घेतली नाही असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.
काम होऊ देणार नाही मागील महिन्यात दिनांक 19 मार्च रोजी शेतकऱ्यांनी रेल्वेचे काम बंद आंदोलन केले होते. तरीही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी त्याची कुठलीच दखल घेत नसल्यामुळे रेल्वे संघर्ष समितीच्या व शेतकऱ्यांच्या वतीने जो पर्यंत योग्य मावेजा मिळत नाही व सदरील कुटुंबातील एका व्यक्तीस रेल्वे विभागात नौकरी देण्यात येत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांनी रेल्वेचे कुठलेच काम चालु देणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
यावेळी शेतकरी रेल्वे संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष विनायक शेळके, सचिव विठ्ठल मस्के, शामसुंदर इंदाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, जि.प.सदस्य जयसिंह सोळंके, शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव, विनायक मुळे, बाळासाहेब मेंडके, सुनिलराव खंडागळे, भाजपाचे नितीन नाईकनवरे,डाॅ.उध्दव नाईकनवरे,डाॅ.रणजीत मस्के,विठ्ठल लगड,प्रशांत सावंत,बप्पासाहेब डावकर यांच्यासह सर्व पक्षीय नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते व हजारो शेतकऱ्यांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला होता. मौजे मोची पिंपळगांव, घोडकाराजुरी, शिवणी, जरुड, बाभुळखुंटा, मौज, ब्रम्हगाव, ढेकणमोहा, बकरवाडी, घाटसावळी, पोखरी, मैंदा, परभणीतांडा, वडवणी, बाहेगव्हाण, मोरवड, हिवरगव्हाण, पुसरा, बाबी, उपळी, लोणवळ,तेलगाव, कोथिंबीरवाडी, भोपा, चाटगाव या गावातील शेतकरी सहभागी होते