परळी : विविध माध्यमातून पूजा चव्हाणची होत असलेली बदनामी थांबवावी,आमच्या कुटुंबाला चार दिवस जगू द्यावे असे कळकळीचे आवाहन पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केले.
पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणानंतर जी बदनामी होत आहे त्याचे आमच्या कुटुंबाला दुःख होत आहे. आधीच पोटचा गोळा गेला आहे त्यामुळे आमच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुन्हा त्यात बदनामी करण्यात येत आहे ती थांबली पाहिजे असे पुन्हा एकदा आवाहन आपण करीत असल्याचे लहू चव्हाण म्हणाले.
लहू चव्हाण म्हणाले की, माझ्यावर पाच मुलींची जबाबदारी आहे. पूजाच्या मृत्यूमुळे झालेल्या दुःखातून थोडं-थोडं सावरू लागलो आहे. परंतु जी बदनामी केली जात आहे,त्याचे दुःख होत आहे. पोलीस तपासात सत्य बाहेर येणारच आहे त्यामळे कोणीही बदनामी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
पूजाचे वडील लहू चव्हाण यांना रक्तदाबाचा त्रास आहे, लहान बहीण दहावीला आहे, तिची आई आजारी आहे. अशा स्थितीत याप्रकरणी विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत, ते योग्य नाही, या प्रकरणात बदनामी थांबली पाहिजे अन्यथा बंजारा समाजाला काहीतरी विचार करावा लागेल असे बंजारा समाजाची एक लेक म्हणून बीडच्या शिवसेना महिला आघाडी प्रमुख ॲड. संगीता चव्हाण यांनी शुक्रवारी लोकमतशी बोलताना सांगितले. पोलीस तपास चालू असताना विरोधक आरोप करून अडथळा आणत आहेत. पूजा चव्हाण ही केवळ बंजारा समाजाचीच लेक नव्हे तर राज्याची लेक आहे. चित्रा वाघ या जे बोलत आहेत ते त्यांना अशोभनीय असल्याचे ॲड. चव्हाण म्हणाल्या.