बीड : मराठा आरक्षण मिळत नसल्याने 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना बीड तालुक्यातील केसापुरी परभणी येथे रविवारी सायं. 6 वाजता उघडकीस आली. मच्छिंद्र रामप्रसाद शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मच्छिंद्र हा शनिवारी परळीतील मराठा मोर्चात सहभागी झाला होता. रविवारी घरी आल्यानंतर तो चिंताग्रस्त होता. घरातील सदस्य बाहेर जाताच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मराठा आरक्षणावरुन राज्यात सुरू असलेले आत्महत्येचा सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. मच्छिंद्र रामप्रसाद शिंदे या 23 वर्षीय तरुणानेही आत्महत्या करुन आपले जीवन संपवले. राहत्या घरीच गळफास घेऊन मच्छिंद्रने आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच, पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे त्याने नमूद केले आहे, असे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांनी ठिय्या मांडला. आर्थिक मदत देण्यासह कुटुंबातील सदस्याला शासकीय सेवेत समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे. उप विभागीय अधिकारी विकास माने, उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. उशिरापर्यंत नातेवाईकांसोबत चर्चा सुरू होती.
जिल्ह्यात चौथी आत्महत्याआतापर्यंत जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी चौघांनी जीवन संपविले आहे. यामध्ये अभिजित देशमुख (विडा, ता. केज), शिवाजी तुकाराम काटे (रा. पिंपळनेर, ता. बीड), कानिफ दत्ता येवले (डोंगरकिन्ही, ता. पाटोदा) यांनी यापूर्वीच आत्महत्या केली आहे. रविवारी मच्छिंद्रने गळफास घेऊन जीवन संपविले.