कडा (जि. बीड) - विनापरवाना सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर पोलिस प्रशासनाने वारंवार कारवाया केल्या. कत्तलखाने उद्ध्वस्त केले, त्यानंतर सील केले, तरीही जनावरांची कत्तल थांबली नाही. शेवटी ग्रामसभेत एकमुखी निर्णय घेऊन मुक्या जनावरांची कत्तल कायमची बंद करण्याचा ठराव आष्टी तालुक्यातील खडकत ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला. ग्रामसभेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक मुक्या जनावरांचे प्राण वाचणार आहेत.
गावकऱ्यांनी सर्व बेकायदेशीर कत्तल थांबवावी. नागरिकांच्या भावना दुखविल्या जाणार नाही याचा सर्व विचार करून गावातील कत्तलखाने बंद करावेत यासाठी ग्रामपंचायतीने २३ जानेवारी रोजी एकमुखी ठराव घेतला आहे.
गावात कत्तलखाने होणार बंद आष्टी तालुक्यातील खडकत येथे सुरू असलेले सात बेकायदेशीर कत्तलखाने उद्ध्वस्त केले होते. त्याचप्रमाणे चार कत्तलखाने सील करण्यात आले होते. परंतु जुन्या ठिकाणी पुन्हा बेकायदेशीर कत्तलखाने उभे केले होते. काही जणांनी सील तोडून पुन्हा कत्तलखाने चालू केले होते. पंधरा दिवसापूर्वी खडकत गावामध्ये गोवंश कापून त्याचे मांस हैदराबादला जात असताना पशुकल्याण मानद सचिव शिवशंकर स्वामी यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पाटोदा पोलिसांच्या मदतीने कडक कारवाई केली होती.