लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडल्याप्रकरणी व तलावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर पाचशे मीटरच्या रस्त्याचे बोगस काम करणाऱ्या गुत्तेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या व इतर मागण्यांसाठी सर्वपक्षीय पाच गावातील ग्रामस्थांच्या वतीने २ ऑगस्ट रोजी तलावाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
धारुर तेलगाव रस्त्यालगत आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल सतरा वर्षानंतर पूूर्ण झाले. या तलावाच्या बाजूनेच राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. महामार्गाचे काम करताना पाटबंधारे विभागाने पर्यायी मार्गासाठी राज्य रस्ते विकास महामंडळासाठी तीन कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र या पर्यायी रस्त्यातील पाचशे मीटरचे काम अर्धवट व बोगस केले. तलाव पहिल्याच वर्षी भरला. यामुळे रस्त्याला धोका निर्माण झाला. राज्य रस्ते विकास महामंडळाने पाटबंधारे विभागाला तसे पत्र दिले. हे पत्र देताच पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग आली. तलावाची पाहणी करून पहिल्या वर्षी तलावाला धोका असल्याच्या नावाखाली चक्क नवा बांधलेला सांडवा फोडला. यातून लाखो लीटर पाणी सोडून दिले. सांडवा फोडायला पाच गावांचा विरोध असताना पाटबंधारे विभागाने अधिकारशाहीचा वापर करीत सांडवा फोडला.
पाटबंधारे खात्याच्या निषेधार्थ यामुळे इरणवाडी, चोरांबा, पहाडी पिरगाव, थेटेगव्हाण, ढगेवाडी येथील ग्रामस्थांनी रास्ता रोकोचे आयोजन केले आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शिनगारे, बाळासाहेब चव्हाण, शिवाजी मायकर, महादेव तोंडे, बजरंग माने, लहू फुटाणे, सरपंच वशिष्ठ मुंडे व ग्रामस्थांनी केले आहे.