लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथील सोळा वर्षीय स्वाती गोविंद राठोड आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी बंजारा समाज बांधवांनी पुकारलेल्या वडवणी बंदला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर बीड परळी हायवेवर शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.इयत्ता नववीत शिकणाऱ्या स्वाती राठोड हिने छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी अमर तिडके व हनुमंत सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आरोपींना अटक करण्यासाठी रविवारी तालखेड फाटा येथे रोस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर सोमवारी वडवणी बंद आणि रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. स्वाती आत्महत्येप्रकरणी कडकडीत बंद पाळण्यात आला.बीड - परळी मार्गावर शिवाजी महाराज चौकात दोन तास रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी जिल्हाभरातून समाज बांधव बहुसंख्येने आंदोलनात सहभागी झाले. सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी झाली. माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी पीडित कुटुंबाला भेटण्यास महिला व बालविकास मंत्र्यांकडे वेळ नसल्याची टीका करुन शासनाने पीडित कुटुंबाला तातडीने २५ लाखांची मदत करण्याची मागणी केली.यावेळी मोहनराव जगताप, प्रा. पी. टी. चव्हाण, जि. प. सदस्य औदुंबर सावंत, शरद चव्हाण, संपत चव्हाण, अॅड. संगीता चव्हाण, विनायक मुळे, दिनेश मस्के, बजरंग साबळे, दादासाहेब मुंडे, बी. एम. पवार, संतोष पवार, विलास राठोडसह जिल्हाभरातुन महिला, मुली, विद्यार्थी, विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तब्बल दोन तासानंतर तहसीलदार प्रभाकर खिल्लारे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन पीडित कुटुंबातील आई वडील आणि विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आले. उपविभागीय पोलीस आधिकारी भास्कर सावंत, पो.नि. सुरेश खाडे, पो. उप नि. ए. एस. सिद्दीकी यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकाने बंदोबस्त ठेवला.
वडवणीत कडकडीत बंद, दोन तास रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:44 AM