बीड : बशीरगंज भागातील हनुमान मंदिराच्या जागेत होत असलेल्या अनाधिकृत बांधकामाचे मोजमाप करण्यास गेलेल्या बीड पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना येथील पुजारी व त्यांच्या कुटूंबियांनी घराबाहेर हाकलले. तसेच बांधकामाचे मोजमाप करण्यास प्रतिबंधक केला. हा प्रकार २२ एप्रिल रोजी घडला. याप्रकरणी बुधवारी बीड शहर ठाण्यात मंदिराच्या पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवणीकर मदन गुरूगंगादास (६० रा.बशिरगंज, बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. पालिसमोर असणाऱ्या हनुमान मंदिराच्या जागेत तळमजल्याचे अनाधिकृत बांधकाम होत आहे. या बांधकामाबाबत बीड पालिकेने पुजाऱ्याला २८ जानेवारी रोजी रितसर नोटीस दिली होती. मात्र या नोटीसला पुजाऱ्याने काहीच उत्तर दिले नाही. अखेर २२ एप्रिल रोजी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक व्ही.टी.तिडके, नगर रचना विभागाचे लिंबगे व इतर अधिकारी, कर्मचारी बांधकाम मोजमाप करण्यासाठी तेथे गेले.
यावेळी या पुजाऱ्याने मोजमाप करण्यास प्रतिबंध केला. तसेच पुजाऱ्यासह त्यांच्या कुटूंबियांनी या सर्वांनाच घराबाहेर हाकलून लावले. हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घालताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे प्रभारी स्वच्छता निरीक्षक राजु वंजारे यांच्या फिर्यादीवरून पुजारी मदन शिवणीकर यांच्यावर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.