रिॲलिटी चेक
बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर सोमवारी सकाळी लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांची तुफान गर्दी दिसली. सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. 'ड्राय रन'ला नियोजनाचा देखावा करणाऱ्या जिल्हा रुग्णालयाचे ढिसाळ नियोजन या निमित्ताने चव्हाट्यावर आले. याच केंद्रावरून आता कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यापूर्वी ८ जानेवारी रोजी ड्राय रन घेण्यात आला. यावेळी प्रतीक्षा कक्ष, नोंदणी, लसीकरण, निरीक्षण कक्ष असे सर्व नियोजन केले जाणार असल्याचा बोभाटा करण्यात आला. परंतु, हा केवळ देखावाच राहिला. सुरुवातीपासुनच जिल्हा रुग्णालयात नियोजन दिसले नाही. विशेष म्हणजे लसीकरणानंतर बसण्यासाठी खुर्च्याही नसल्याचे समोर आले आहे. आशा, अंगणवाडीसेविकांना जमिनीवर बसविल्याचा प्रकार 'लोकमत'ने निदर्शनास आणला होता. त्यानंतर केवळ थोडे दिवस नियोजन झाले. सोमवारी पाहणी केली असता रुग्णालयाचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला. लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांची तुफान गर्दी दिसली. रुग्णालयाचे कसलेही नियोजन नव्हते. यावर उपाययोजना करायच्या सोडून अधिकारी हातावर हात देऊन हा सर्व प्रकार पाहत होते. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
लस घेतल्यानंतर फेरफटका
लस घेतल्यानंतर लाभार्थ्याने निरीक्षण कक्षात ३० मिनिटे थांबणे बंधनकारक आहे. परंतु, सोमवारी असे काहीच दिसले नाही. लस घेतलेले लोक बाहेर फिरत होते. तर, काहींनी तत्काळ काढता पाय घेत घर गाठले.
रुग्णालयाला यात्रेचे स्वरूप
जिल्हा रुग्णालयात गर्दी पाहून दोन ठिकाणी लसीकरण करण्यात आले. परंतु, रांगा लावलेल्या नव्हत्या. प्रतीक्षा करण्याची व्यवस्था नव्हती. नोंदणीच्या ठिकाणी अक्षरश: लाभार्थ्यांची झुंबड उडाली होती. जिल्हा रुग्णालयाला दुपारच्या सुमारास यात्रेचे स्वरूप आले होते. परंतु, अधिकाऱ्यांना याचे काहीच देणेघेणे असल्याचे दिसले नाही.
हा तर लोकांच्या जीवाशी खेळ...
एकीकडे राज्यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच कोरोना लसीकरण बंधनकारक केले. परंतु, वाढती गर्दी पाहता येथे काहीच नियोजन नव्हते. एकाचवेळी एवढ्या लोकांना बोलावून त्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप सामान्यांमधून करण्यात आला.
गर्दी पाहून काढता पाय
लसीकरण केंद्रावरील गर्दी पाहून अनेक लाभार्थ्यांनी काढता पाय घेतला. याबाबत विचारले असता येथे कोरोनामुक्त होण्यापेक्षा कोरोना संसर्ग होण्याचीच दाट शक्यता असल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.
कोट
लसीकरण केंद्रावरील परिस्थिती सुधारण्याबाबत लगेचच सूचना करतो.
रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी बीड
===Photopath===
220221\222_bed_4_22022021_14.jpeg~220221\222_bed_3_22022021_14.jpg
===Caption===
जिल्हा रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर सोमवारी झालेली तुफान गर्दी.~जिल्हा रूग्णालयातील लसीकरण केंद्रावर सोमवारी झालेली तुफान गर्दी.