बीड : आज जे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्यापाठीमागे अनेकांचा त्याग, समर्पण आणि संघर्ष आहे. मुक्तिसंग्राम ही संघर्षाची कहाणी आहे, असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक तथा लेखक प्रभाकर महाजन यांनी केले.
स्वा. सावरकर महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, तर सावरकर संकुलाचे अध्यक्ष गजानन जगताप, पदाधिकारी प्रमोद कुलकर्णी, सतीश कुलकर्णी, महेश वाघमारे, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रभाकर महाजन म्हणाले, निजाम आणि रझाकारांनी मराठवाड्यातील जनतेला खूप त्रास दिला. छळ केला, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला मराठवाडा मुक्तीसाठी संघर्ष करावा लागला. विद्यार्थ्यांपासून ते वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी सर्वसामान्यांनी सहभाग नोंदवून मराठवाडा मुक्त केला. प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे म्हणाले, मुक्ती संग्रामाचा इतिहास हा आपल्याला भविष्यातील वाटचालीसाठी एक दिशादर्शक आहे. अध्यक्षीय समारोपात सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे म्हणाले की, स्वतंत्र भारतात विलीन होण्यास निजामाने नकार दिला त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी मराठवाड्यात पोलीस ॲक्शन करून मराठवाडा मुक्त केला, हा विजय एकजुटीचा आहे. उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राम गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. छत्रपती पांगारकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमात डॉ. जे. के. भालेराव यांनी लिहिलेल्या ‘सु-प्रशासन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत उपप्राचार्य डॉ. राजेश ढेरे, प्रा. सचिन कंदले, प्रा. संजय काळे, प्रा. विशाल नाईकनवरे यांनी केले. मुक्ती संग्राम दिनानिमित्त सहकार्यवाह चंद्रकांत मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.