आष्टी : मागील ३५ वर्षांपासून मी राजकारणात असून, २० वर्षे आमदारकी भोगली आहे. मी लोकसभा निवडणुकीत माझ्या समाजाचा रोष पत्करून प्रामाणिकपणे काम केले आणि आत्ता विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझा प्रचार कसा केला, हे मी नाही तर संपूर्ण मतदारसंघाने पाहिले. मतदारसंघाने इमानदारी जपली, पण तुम्ही नाही. आजपासून तुम्ही राजकारणातला सहकारी गमावल्याची भावना भाजपचे सुरेश धस यांनी आ. पंकजा मुंडे यांच्याबद्दल व्यक्त केली, तसेच त्यांनी अपक्ष भीमराव धोंडे यांना मदत केल्याची टीकाही केली.
आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आज ७७ हजार ९७५ मतांनी सुरेश धस यांनी विजय मिळवल्यानंतर आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शनिवारी सायंकाळी ५ विजयी सभा झाली. यावेळी धस म्हणाले, आज मला मतदारसंघांतील जनतेने पाचव्यांदा आमदार म्हणून प्रचंड मताने विजय करून काम करण्याची संधी दिली. मी माझ्या राजकीय जीवनात कधीच जातीयवाद केला नाही आणि तुम्ही स्व. गोपीनाथ मुंडे यांची कन्या असूनही त्यांच्या राजकारणात कधीच त्यांनी असे लेच्या- पेच्याचे राजकारण केले नाही; पण तुम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून आम्हाला निवडणुकीत पाडण्यासाठी रणनीती आखता हे वागणे चांगले नाही, असा इशाराही पंकजा मुंडे यांना दिला.
यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यावर तोफ डागत धोंडे साहेब आपण संस्थानिक आहात, पण तुमचे कायधंदे सुरू आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे, तसेच आता त्यांच्या संस्थेतील शिक्षकांना त्रास होणार नाही, तर राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्यावर टीका करताना धस म्हणाले, हे रनिंग आमदार सभेत मला म्हणतात, खोडावर घाव घालतो. आरे चांगली कुऱ्हाड घेऊन शेतातील झाडाच्या खोडावर घाव घालत बसा, कारण तुमची क्षमता मतदारसंघाने आजच्या निकालात पाहिली असल्याचे त्यांनी सांगितले.