माजलगाव : शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे दिवसाच सुरू राहत आहेत. मात्र, ऐन गरजेच्या वेळी रात्री पथदिवे बंद राहत असून, भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन विजेचा अपव्यय टाळावा, अशी मागणी होत आहे.
नाल्यातील सांडपाणी रस्त्यांवर येऊ लागले
पाटोदा : शहरातील अनेक भागांमध्ये नालेसफाई झालेली नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे चिखल तयार होत आहे. तसेच दुर्गंधी सुटत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लॉकडाऊन काळात प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घ्यावी आणि गैरसोय दूर करावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ
वडवणी : तालुका आणि परिसरात शासकीय कार्यालय, बँकांसमोरून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. काही सेकंदातच हँडललॉक तोडून दुचाकी लांबवली जात आहे. या चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. काही नागरिक तर तक्रार देणेही टाळत आहेत.
रस्त्याची दुरवस्था, वाहनधारकांचे हाल
बीड : शहरातील ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था होत आहे. मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, येथून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संबंधित यंत्रणेने खड्डे बुजवावेत, गरज पडल्यास रस्ता पुन्हा तयार करावा, अशी मागणी वाहनधारक आणि पादचाऱ्यांमधून होत आहे.