बीड : मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्यास महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार आहे. त्यामुळे आरक्षणाची पुढील कार्यवाही तत्काळ करण्यात यावी व मराठा समाजाच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी ५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आमदार विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका करीत न्याय व हक्कासाठी बीडमधून पहिल्या मोर्चा ५ जून रोजी काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा नियोजित मोर्चा शनिवारी निघणार आहे. मोर्चाला होणारी गर्दी लक्षात घेत जिल्हा पोलीस दलाकडून कायदा आणि सुव्यस्थेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. यावेळी दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, २५ पोलीस अधिकारी, ३५० पोलीस कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तैनात असणार आहे. दरम्यान, सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करावे, तसेच कोरोनाच्या संदर्भातील सर्व काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
...
परजिल्ह्यातील वाहनांना बंदी
कोरोनाचा संसर्ग सुरूच असल्यामुळे परजिल्ह्यातील वाहनांना विनापास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमांवर असलेल्या चेकपोस्टवर तपासणी करून रीतसर परवानगी असेल तरच, वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली.