बीड : राज्य सामाईक परीक्षा एमएचटी सीईटी-२०२१ नुसार बीड जिल्हा केंद्रावर २० सप्टेंबर ते १ आक्टोबर या कालावधीमध्ये बीड येथील दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन, बस स्टँडच्या पाठीमागे, शिक्षक कॉलनी येथे सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळात दोन सत्रामध्ये ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्र परिसरात कडक सुरक्षा असणार असून, १४४ कलम लागू करण्यात आले आहे.
परीक्षा सुरू होण्याचा एक तास अगोदरपासून ते परीक्षा संपेपर्यंत १०० मीटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, परीक्षार्थी यांच्या व्यतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच परीक्षा केंद्रापासून १०० मीटर अंतराच्या परिसरात फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण व संदेश कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाइल, वायरलेससेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, कॉम्प्युटर बाळगण्यास तसेच झेरॉक्स, एसटीडी मशीन चालू ठेवण्यास व ध्वनिक्षेपक वाजवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रशासनाने वेळेअभावी नोटीस न देता एकतर्फी आदेश दिले आहेत. तसेच कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला उपविभागीय दंडाधिकारी नामदेव टिळेकर यांनी दिला आहे.