--------------------------------------------
ढोल-ताशाची विक्री मंदावली
अंबेजोगाई : गणेशोत्सवामध्ये ताशा, ढोलाची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. या वर्षी या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गणरायांचे घरोघरी आगमन होत असले, तरी उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. त्यामुळे दरवर्षी मागणी असलेल्या ढोल-ताशाची खरेदी या वर्षी थंडावली आहे. दुरुस्तीची कामेही कमी प्रमाणात येत आहेत. ढोल-ताशा वाजविणारांची चिंता यामुळे वाढली आहे.
-----------------------------------------
काटेरी झुडपे तोडण्याची मागणी
अंबेजोगाई: ग्रामीण भागासह शहरातील अनेक रस्त्यांवर सध्या काटेरी झुडपे, गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अनेक वेळा वळणाच्या रस्त्यावर समोरून येणारे वाहन दिसत नाही. यामुळे अपघात वाढले आहेत. त्यामुळे गणपतीच्या आगमनापूर्वी काटेरी झुडपे तोडावीत. अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.
-------------------------------------------------
पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले
अंबेजोगाई : शहरातील अनेक प्रभागांमध्ये पाणी वितरणाचे नियोजन कोलमडले आहे. मागील काही दिवसांपासून पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे अनेक भागात नवीन नळ कनेक्शन जोडणी सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी मोहिमेस अल्प प्रतिसाद मिळत असल्याने जुन्याच पाईपलाईनमधून पाणी सोडले जात आहे. यामुळे पाणी वितरणाचे रोटेशन कोलमडले आहे.
-----------------------------------------------
झाडांना ट्री गार्ड उपलब्ध करून द्या
अंबेजोगाई : शहरात अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. मात्र, अनेक नवीन झाडांना संरक्षण नाही. यासाठी नगरपरिषदेच्या वतीने ट्री गार्ड उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.निशिकांत पाचेगावकर यांनी केली आहे. नागरिकांकडून पावसाळ्यामध्ये वृक्षलागवड केली जात आहे. यामध्ये नागरिकांनी स्वखर्चातून वृक्षलागवड केली आहे. अनेक भागांमध्ये मोकळ्या जागेत लावलेली झाडे जनावरे फस्त करीत आहेत.