अंबाजोगाई (बीड) : परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयासमोर आज सकाळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा समाज, अंबाजोगाई तालुका व मराठा आरक्षण कृती समिती यांनी सहभाग घेतला.
यावेळी उपविभागीय अधिकार्यांना सकल मराठा समाज व मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात 1) मराठा समाजाला आरक्षण मिळावे व 2) शासनाकडून करण्यात येणारी प्रस्तावित नौकर भरती तात्काळ थांबविण्यात यावी अशा दोन मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी मराठा समाजाची सद्य परिस्थिती विषद केली. तसेच मराठा समाजासोबतच मुस्लिम व धनगर समाजाला त्यांच्या मागणी प्रमाणे व इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी देशमुख यांनी केली. यानंतर कॉ.बब्रुवाहन पोटभरे, दाजीसाहेब लोमटे, गोविंद पोतंगले, रणजित लोमटे, राणा चव्हाण, वैजेनाथ देशमुख यांनी आंदोलकांना संबोधित केले.
आंदोलनात बीड जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पाटील,जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सिरसाट,अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक दाजीसाहेब लोमटे, पंचायत समितीचे उपसभापती तानाजी देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रणजित लोमटे, शिवसेनेचे प्रशांत आदनाक, अॅड.माधव जाधव, बन्सीअण्णा जोगदंड, वैजेनाथ देशमुख, रविकिरण देशमुख, भिमसेन लोमटे, नंदकुमार जाधव, राजाभाऊ लोमटे, पत्रकार रणजित डांगे, पत्रकार नागेश औताडे, पत्रकार सतिष मोरे, बापुसाहेब चव्हाण, अॅड.प्रशांत शिंदे,लक्ष्मण सोनवणे,संभाजी वाळवटे,तुकाराम शिंदे, सोमनाथ धोत्रे, अॅड.ईस्माईल गवळी, राजेश वाहुळे, अॅड.व्ही.डी.शिंदे, बाळासाहेब देशमुख, भागवतराव लाखे आदींसहीत सकल मराठा समाजाचे व सर्वधर्मिय समाज बांधव यांची उपस्थिती होती.