बीड : मालवाहतूक करणाऱ्या चालकांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात बीड जिल्ह्यातील चालकांनी सहभाग नोंदविला असून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने मार्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान टँकर चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये सकाळपासून पंपांवर इंधन भरण्यासाठी गर्दी दिसून आली.
सोमवारी जालना रोड भागातून ट्रान्सपोर्ट चालकांनी मोर्चा काढला. अण्णा भाऊ साठे चौक, बस स्थानक रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नगर रोडमार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शिष्टमंडळाने या कायद्यामुळे होणाऱ्या परिणामांची तसेच चूक न पाहता मोठ्या व जड वाहनांच्या चालकांना दोषी ठरविले जात असल्याचे नमूद केले. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय काकडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. बीड जिल्हा ट्रान्सपोर्ट संघटना, मोटार टेम्पो चालक- मालक संघटना, ॲपे रिक्षा चालक -माल संघटना, शहर वाहतूक रिक्षा चालक -मालक संघटना, टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स संघटना, खासगी वाहन चालक -मालक संघटनांचा या मोर्चात सहभाग होता.