बीड : ग्रेड पे -२ नुसार गट ब चा दर्जा मिळालेला असला, तरी वेतन मात्र वर्ग-३ प्रमाणे मिळत असल्याने शासनाच्या धोरणाच्या विरोधात जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदारांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यातील १४ तहसीलदार व ३९ नायब तहसीलदारांच्या आंदोलनामुळे सर्वच तहसील कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला.
नायब तहसीलदारांना वर्ग- ३ मधून वर्ग-२ (गट- ब) चा दर्जा १३ नोव्हेंबर १९९८ च्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेला आहे. परंतु त्यांचे वेतन अद्यापपर्यंत वर्ग -३ च्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच आहे. त्यामुळे नायब तहसीलदार ग्रेड पे वर्ग-२ च्या राजपत्रित अधिकाऱ्यांप्रमाणे ४ हजार ८०० रुपये करण्याबाबत शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. परंतु के. पी. बक्षी समिती व शासनाने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने १ मार्च रोजी टप्प्याटप्प्याने होणाऱ्या आंदोलनाबाबत शासनाला नोटीस दिली. या प्रश्नावर अद्याप कसलीच दखल न घेतल्याने नियोजनानुसार सर्व तहसीलदार व नायब तहसीलदारांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
साहेबांची सही राहिली, फाईली तुंबल्यासोमवारी या आंदोलनाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला तर शासनाचे निगडित कामकाज ठप्प झाले. तहसीलदार आणि नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीशिवाय कोणत्याही प्रकरणात निर्णय होत नाही. प्रस्ताव, फाईल जिल्हा प्रशासनाकडे गेल्या नाहीत.
विद्यार्थी, शेतकऱ्यांची कामे खोळंबली
आगामी शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे उत्पन्न, अधिवास, जात प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र मिळू शकले नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी निकाली निघाल्या नाही. कृषी परवान्यांची कामे खोळंबली. आधी कर्मचाऱ्यांचा संप त्यानंतर मार्च एन्डची कामे आता तहसीलदार व नायब तहसीलदारांचे आंदोलन यातच मंगळवारची सुटी (४ एप्रिल) यामुळे कामे घेऊन येणाऱ्या सामान्यांची तारांबळ उडाली.