बीड : ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडची चार मुले एमबीबीएसच्या अंतिम वर्षात यश संपादन करून डॉक्टर बनली आहेत. या चारही मुलांचे पालकत्व शांतीवन (आर्वी ता. शिरूर जि. बीड) या संस्थेने स्वीकारले होते. परिस्थितीवर मात करत मजुरांच्या मुलांनी यश संपादन केल्याने कौतुक होत आहे.
स्नेहल नागरगाेजे, रामदास चेपटे, किरण तोगे आणि रोहित चव्हाण अशी डॉक्टर बनलेल्या या चार मुलांची नाव आहेत. स्नेहल ही शिरूर तालुक्यातीलच खांबा लिंबा येथील रहिवासी. बारावीला असताना तिचे पालकत्व शांतीवनने स्वीकारले. नाशिक येथील यशवंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातून तिने यश संपादन केले. रामदास हा देखील शिरूरमधील घुगेवाडीचा रहिवासी. बारावीनंतर याचे पालकत्व स्वीकारले. त्याने इस्लामपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पूर्ण केले. किरणने पुण्याच्या बी.जे मेडिकल कॉलेजमधून यश मिळविले. तो मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील छोटेवाडीचा रहिवासी आहे. राेहित हा अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा. सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्याने शिक्षण पूर्ण केले. हे चौघेही परिस्थितीवर मात करून डॉक्टर बनले आहेत. आता त्यांनाही सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्य सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
उच्च शिक्षित मुलांसाठी तारांगण प्रकल्पशांतीवन या मुख्य संस्थेच्या अंतर्गत विविध प्रकल्प आहेत. त्यातीलच तारांगण हा एक आहे. १० वी नंतरच्या सर्व मुलांचे शिक्षण या प्रकल्पातून केले जाते. सध्या जवळपास १०० मुले उच्च शिक्षित आहेत. यात १६ वैद्यकीय शिक्षण घेत असून त्यापैकीच हे चौघे डॉक्टर बनले आहेत. तर इतर मुले आयटीआय, अभियांत्रिकी, नर्सिंग यासह वेगवेगळे कोर्स करत आहेत.
भान ठेवून काम करावेआमच्याकडील प्रत्येक मुलाला उच्च शिक्षणासाठी पाठविण्यापूर्वी त्यांना सामाजिक भान ठेवून काम करण्याचे शिकविले जाते. ही चार मुले डॉक्टर बनल्याने आरोग्य सेवेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली आहे. गरिबांची सेवा करावी, हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तसेच समाजाप्रती चांगली भावना ठेवून सेवा देतील, असा विश्वास असल्याचेही शांतीवनचे संचालक कावेरी व दीपक नागरगोजे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.