बीड : मागील तीन दिवसांपासून बीड आगारात आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकीच एका चालकाने विषारी द्रव प्राशन केले. ही घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास बीड आगारातील मुख्य प्रवेशद्वारावर घडली.
या चालकाची प्रकृती गंभीर असून जिल्हा रूग्णालयातील आयसीयू विभागात दाखल करण्यात आले आहे. अमोल कोकटवाड (वय ३५ रा.बीड) असे विषारी द्रव प्राशन केलेल्या चालकाचे नाव आहे. आमोल हे एसटी कर्मचाऱ्यांनीि पुकारलेल्या संपात मागील तीन दिवसांपासून सहभागी आहेत. जिल्ह्यात तीव्र आंदोलन करूनही शासन दखल घेत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी आंदोलनातून उठत आगाराचे मुख्य प्रवेशद्वार गाठले. आपल्याकडे कोणी पहात नसल्याची संधी पहात त्यांनी विषारी द्रव प्राशन करून जीवयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.
एवढ्यात आगारातून आलेल्या एका कर्मचाऱ्याने पाहिल्याने आरडाओरडा केला. त्याच्या हातातील डब्बाही फेकून देण्यात आला. त्याला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून अतिदक्षता विभागात पाठविण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकाराने मात्र आता आंदाेलन आणखीनच चिघळण्याची भिती व्यक्त होत आहे.