अंबाजोगाई : एसटी महामंडळातील वाहक, चालक हे प्रवाशांची काळजी घेतात. कष्ट करून घर प्रपंच चालवतात. त्यामुळे पगार कमी असले तरी समाधानकारक जीवन जगतात, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते एस. बी. सय्यद यांनी केले.
मंगळवारी अंबाजोगाई आगारातील पाच कर्मचारी सेवानिवृत्त झाले. आयोजित केलेल्या निरोप समारंभात ते बोलत होते. या वेळी आगार प्रमुख नवनाथ चौरे, सहायक वाहतूक अधीक्षक अमर राऊत, वाहतूक निरीक्षक पल्लेवड, लेखाकार ओमकार कुलकर्णी, करपे, बाळासाहेब फड, बाबुलाल शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सय्यद म्हणाले, एसटी महामंडळातील कर्मचारी सेवाभावी वृत्तीने कमी पगारावर जनतेला सेवा देत आहेत. दुसरीकडे काम कमी आणि पगार जास्त आहे तेथे सेवाभाव नाही. परंतु एसटी महामंडळामुळे राज्यातील गरीब जनतेला कमी पैशात जास्त प्रवास ही सुविधा मिळते. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. त्यांच्या पगार वाढीसाठी नेत्यांसह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. या वेळी आगार प्रमुख नवनाथ चौरे, करपे यांनी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व उपायांबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी सेवानिवृत्त वाहक राजकुमार (मुन्ना) लखेरा, चालक ज्ञानोबा पौळ, चालक हनुमंत पवार, चालक अंकुश वाकडे, सहायक दिलीप शेवाळे आदींचा सहपरिवार फेटा बांधून तसेच शाल, श्रीफळ, ड्रेस, साडीचोळी देऊन सत्कार करून निरोप देण्यात आला. या वेळी आगारातील कर्मचारी, वाहक, चालक तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचे नातेवाईक, मित्र परिवार, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय काळम यांनी केले तर उपस्थितांचे आभार बाळासाहेब फड यांनी मानले.