गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन येथील शेतक-याने मार्च महिन्याच्या सुरूवातीला आपल्या अडीच एक्कर शेतात तैवान जातीच्या पपईची आडिच हजार रोपाची लागवड केली.मात्र पपई लावल्या लावल्या मार्च महिन्यात या भागात वादळी पाऊस व गारपिट होवुन सर्व पपई खाली पडली.मात्र खचुन न जाता शेतक-याने त्याच पपईला उभे करून सहा महिन्यात तब्बल ५ ते ६ लाखाचे उत्पन्न मिळवले आहे.
तालुक्यातील तिर्थक्षेत्र असलेल्या राक्षसभुवन येथील शेतकरी प्रदिप काळम यांनी आपल्या आडिच एक्कर शेतात दिड लाख रूपये खर्च करून मार्च महिन्यात तैवान जातीच्या पपईची अडीच हजार झाडाची लागवड केली. मात्र पपई लावल्या लावल्या रोप लहान असतांना मार्च महिन्यातच या भागात जोरदार वादळी वा-या सह गारपीट होवुन सर्व झाडे उन्मळून पडली. यात अर्धा एक्कर पपईचे झाडे सडुन गेली. यातही शेतकरी प्रदिप काळम यांनी खचुन न जाता के.जी शाहिर याच्यां मार्गदर्शनाखाली यातील दोन एक्कर वरिल पडलेली पपई पुन्हा उभी करून तीची सहा महिने चांगली जोपासना करून आजमितीला त्याच्या शेतातील पपईचे उत्पन्न निघु लागले असुन पहिली विक्री त्यांनी दोन दिवसापूर्वी करून सहा टन पपईची विक्री करून दिड लाखाची कमाई झाली.
आणखी चार लाखाची पपई झाडाला
अजुन मोठ्या प्रमाणात झाडाला पपई आहेत. त्या आठ दिवसात निघुन त्यातुन चार लाखाचे उत्पन्न निघेल. तसेच आसमानी संकटे शेतक-यापुढे नेहमी उभी राहतात. मात्र शेतक-यांनी या संकटाचा सामना करून व खचुन न जाता जोमाने व मेहनतीने काम केल्यास यश नक्कीच येते असे शेतकरी प्रदिप काळम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. ही बाग पाहण्यास शेतकरी गर्दी करीत आहेत.