बीड - परळीचे गुरुवर्य, बाल साहित्यिक आबासाहेब वाघमारे गुरुजींचा अमृत महोत्सव सोहळा रविवारी परळीत संपन्न झाला. वाघमारे गुरुजींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एकाच व्यासपीठावरुन शाब्दीक फटकेबाजी केली. त्यावेळी, विद्यार्थी चांगले की वाईट हे मार्कशीट ठरवते, असे म्हणत धनंजय मुंडेंनीपंकजा मुंडेंना टोला लगावला.
पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमाचा संदर्भ देत धनंजय मुंडेंनी पंकजा यांना चिमटा काढला. मंत्रीमहोदयांनी सांगितलं की, मी चांगली विद्यार्थी आहे, मी वेळेवर आले. आता, चांगले विद्यार्थी वेळेवर येतात आणि लवकर जातात हे मला पहिल्यांदाच कळालं. आम्ही कसे चांगले की वाईट हे माहित नाही. शेवटी विद्यार्थी चांगला की वाईट हे मार्कशीट ठरवते. पण, काहीही असो वेळेला आणि वेळेच्या शेवटला आम्ही कायम सोबत असतो, हे मी सांगतो, असे म्हणत पंकजा मुंडेंच्या लवकर निघून जाण्यावरुन धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना परळीतीलच मंचावरुन सुनावले. यावेळी उपस्थितांनीही धनंजय मुंडेंच्या भाषणाला दाद दिली.
साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग नाव असलेल्या वाघमारे गुरुजींच्या कार्यक्रमात गुरूजींचा गौरव ग्रंथ 'सृजनामृत', पुस्तक 'रुजवण' या मूल्य विचार संग्रहाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमात गुरुजींची सर्व ग्रंथसंपदा 'ब्लॉग'वर उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व मान्यवरांनी वाघमारे गुरुजींच्या कार्याची दखल घेतली. वैद्यनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुजींची शिकवण, त्यांची शिस्त अशा विविध आठवणी सांगितल्या. परदेशात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने व्हिडोओद्वारे सरांविषयी आपले मनोगत मांडले. या नेत्रदीपक सोहळ्यास सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. इंद्रजित भालेराव, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रा. फ. म. शहाजिंदे, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे मंचावर उपस्थित होते. हा गौरव सोहळा साहित्यिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या सर्व रसिकांना एक आगळीवेगळी पर्वणी ठरला.