लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सलग दोन वर्षांपासून ११ वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची दोघांनी छेड काढली. शुक्रवारी सकाळी मुलीच्या भावाने मित्रांच्या सहाय्याने त्यांना चोप देत शिवाजीनगर ठाण्यात आणले. अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडले. बीड शहरातील आदर्श नगरमधील डीपी रोडवर घडली.सोनाली (नाव बदललेले) ही आगोदर बलभीमनगर भागात रहात होती. याच गल्लीत रहाणाºया वर्गातीलच सुरेश (नाव बदललेले) या मुलाने तिचा पाठलाग सुरू केला. शाळेत जाता येता तो तिची छेड काढत असे. हा प्रकार तिने आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तो सुरेशच्या आई-वडिलांना सांगितला. मात्र, तरीही त्यांच्यात सुधारणा झाली नाही. अखेर सोनालीच्या कुटूंबियांनी ते घर सोडून पंचशीलनगर भागात राहण्यासाठी आले. येथेही त्याने पाठलाग सोडला नाही.सोनाली ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती, त्याच महाविद्यालयात त्याने ११ वीसाठी प्रवेश घेतला. वर्गात बसण्यापासून ते घरी जाईपर्यंत तो तिचा पाठलाग करीत असे. हा प्रकार तिने महाविद्यालय प्रशासनाला सांगितले. महाविद्यालयाने त्याला समज दिली होती. तरीही सुधारणा झाली नाही. अखेर शुक्रवारी सकाळी त्याने सोनालीला मोबाईलवरून संपर्क केला. तिने हा प्रकार आपल्या भावाला सांगितला. त्याने मित्रांच्या सहाय्याने त्याला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर सुरेशसह त्याच्या मित्राला पकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोनि शिवलाल पुरभे यांनी मुले अल्पवयीन असल्याने त्यांना व त्यांच्या पालकांना समज देऊन सोडून दिले.दरम्यान, दामिनी पथकाने शहरात गस्त वाढविण्याची मागणी आहे.