बीड : बारावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थिनीने गावातीलच शेजाºयाकडे दुचाकीवरून लिफ्ट मागितली. अर्धा किमी दूर गेल्यानंतर मागच्यामागेच खाली पडल्याने डोक्याला मार लागला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रायमोहाजवळ घडली.
मुन्नी बबन पठाण (रा.येवलवाडी) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. मुन्नीची रायमोहा येथील जालींदरनाथ माध्यमिक विद्यालयात परीक्षा सुरू आहे.
यापुर्वीचे पेपर चांगले गेल्याने ती खुप खुष होती. शेवटचे दोन पेपर राहिले होते. त्यापैकी एक पेपर बुधवारी दुपारी ३ ते ६ या वेळेत होता. त्यासाठी ती घरातून वेळेवर निघाली. गावापासून काही अंतरावर आल्यावर शेजारीच राहणारे उत्तम सुतार हे त्यांच्या मुलाला रायमोहा येथे दुचाकीवरून परीक्षेसाठी सोडण्यास जात होते. ओळखीचे असल्याने मुन्नीने त्यांच्याकडे लिफ्ट मागितली.
उत्तम सुतार यांनीही तिला लिफ्ट दिली. उत्तम सुतार यांचा मुलगा सचिन आणि मुन्नी दोघेही परीक्षेच्या अभ्यासाबद्दल चर्चा करीत होते. एवढ्यात लिफ्ट दिलेल्या अंतरापासून एक किमी अंतरावर येताच मुन्नी दुचाकीवरून मागच्यामागेच पडली. यामध्ये तिच्या डोक्याला मार लागला. हा प्रकार सुतार यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ दुचाकी थांबवून तिला रायमोहा येथील रूग्णालयात दाखल केले. परंतु रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे रायमोहा येथील डॉक्टरांनी तिला जिल्हा रूग्णालयात रेफर केले. परंतु दुर्दैवाने तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. सायंकाळपर्यंत या घटनेची कोठेही नोंद झालेली नव्हती. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला होता.मुन्नीचे आई-वडील ऊसतोड मजूरमुन्नीची घरची परिस्थिती हलाखीची आहे. तिचे आई-वडील श्रीगोंदा येथे ऊसतोडणीसाठी गेलेले आहेत. ती सध्या आजीकडे गावात राहात होती. मुन्नीच्या मृत्यूची बातमी तिच्या आई-वडिलांना दिली असून ते बीडकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वीही दिली होती ‘लिफ्ट’यापूर्वीच्या दोन पेपरलाही उत्तम सुतार यांनी आपल्या मुलाबरोबर मुन्नीला आपल्या दुचाकीवरुन परीक्षेला घेऊन गेले होते. आपल्या मुलाप्रमाणेच तिची काळजीही घेत परीक्षा झाल्यानंतर परत घेऊन आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले नव्हते. हा सर्व प्रकार अपघाताने झाल्याची चर्चाही जिल्हा रुग्णालय परिसरात होती.माझ्या मुलाला परीक्षेसाठी सोडायला जात होतो. याचवेळी मुन्नी पठाणने माझ्याकडे लिफ्ट मागितली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर ती मागच्यामागेच पडली. त्यानंतर तिला तात्काळ रूग्णालयात दाखल केले. परंतु तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मी प्रामाणिक हेतूने मदत केली. दुर्दैवाने ही घटना घडल्याने मनात भीती निर्माण झाली आहे. -उत्तम सुतारदुचाकीचालक, येवलवाडी