लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बारावीच्या परीक्षेत रसायनशास्त्र विषयाचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. पेपर अवघड गेल्याचे घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याची समजूत घातली होती. परंतु तरीही त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, अभ्यासाचा ताण, परीक्षा अशा विविध कारणांमुळे विद्यार्थी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे.समीर सतीश ठाकूर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. समीर हा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. सध्या बारावीची परीक्षा सुरु आहेत. २८ फेब्रुवारी रोजी रसायनशास्त्राचा पेपर झाला. वर्षभर अभ्यास केला. परंतु तरीही रसायनशास्त्राचा पेपर अवघड गेल्याने समीर अस्वस्थ झाला होता. ही बाब अनेकदा त्याने आपल्या घरी देखील बोलून दाखविली. आपला मुलगा पेपर अवघड गेल्याने तणावात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला धीर दिला. त्याची समजूत घातली. घरच्यांनी समजूत घालूनही तो नैराश्यातून बाहेर येऊ शकला नाही.वारंवार पेपर अवघड गेल्याचे त्याच्या डोक्यात होते. यातूनच त्याने त्याने मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घरात कोणीच नसताना गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नगर पालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सतीश ठाकूर यांचा समीर हा कनिष्ठ मुलगा होता.दरम्यान, मुले तणावाखाली आहेत का? त्यांच्या वागण्यात काही बदल जाणवतोय का, यावर पालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे.धावपळीच्या जीवनात पालकांकडून दुर्लक्ष होत असल्याने आणि त्यांना वेळ दिला जात नसल्याने ते एकाकी पडत आहेत. त्यामुळेच त्यांना आपल्या अडचणी कोणासमोर मांडाव्यात, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळेच ते टोकाचे पाऊल उचलतात.आत्महत्येचे सत्र सुरूच : कक्ष स्थापन करादहावी, बारावीच्या परीक्षेला सुरूवात झाल्यापासून राज्यात आतापर्यंत ८ ते १० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जीवन संपविले आहे. विद्यार्थी आत्महत्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनालाच काही तरी पाऊल उचलण्याची गरज आहे. तणाव आणि नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांनीही खचून न जाता नैराश्य आल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करून घेणे गरजेचे आहे.
अंबाजोगाईत पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 11:18 PM
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : बारावीच्या परीक्षेत रसायनशास्त्र विषयाचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना ...
ठळक मुद्देकुटुंबियांनी समजूत घालूनही उचलले टोकाचे पाऊल