अंबाजोगाई : यावर्षी उत्तीर्ण होणाऱ्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाँड सेवा सक्तीची करण्यात आली आहे. ही सेवा करायची नसल्यास १० लाख रुपये भरून त्यातून सवलत घेता येणार आहे. या सेवेसाठी २१ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या १०० विद्यार्थ्यांना ही बाँड सेवा करावी लागणार आहे.
एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात दोन वर्षे सेवा आधीपासूनच बंधनकारक आहे; परंतु काही विद्यार्थी पैसे भरून यातून सवलत घेत असत. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने यावर्षी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सेवा बंधनकारक राहील, असे स्पष्ट केले आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या व मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत चालल्याने हाहाकार उडाला आहे. वैद्यकीय सेवा वेळेवर मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. काही ठिकाणी सुविधा आहे. मात्र, वैद्यकीय अधिकारी नाहीत, तर काही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी असून, कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्ण शहराकडे धाव घेत आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आता वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने यावर्षी एमबीबीएस उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक केले आहे. या नियमामुळे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना सेवा करावी लागणार आहे.
ग्रामीण भागात सेवेसाठी तत्परता
गेल्या पाच वर्षांत अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयातून ५०० विद्यार्थी डॉक्टर झाले आहेत. त्यापैकी या सर्व डॉक्टरांनी आपली सेवा पूर्ण केली आहे. काही विद्यार्थ्यांनी सवलत घेतली. मात्र, यावर्षी अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात जाऊन सेवा करण्यासाठी तयार झाले आहेत. कारण ग्रामीण भागातच खरी गरज डॉक्टरांची आहे. अशा वेळी काम करण्याची संधी मिळत असेल तर ती नाकारणे योग्य नाही. अशा ठिकाणी नवीन डॉक्टरांना सेवा देण्याची संधी दिल्यास आरोग्य सेवेला मोठा हातभार लागू शकतो आणि ही सेवा देण्यासाठी नवीन डॉक्टर तत्पर झाले आहेत.
----------
अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयाची १०० विद्यार्थ्यांची सेवा मेडिकल पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी-१००, गत पाच वर्षांत सवलत घेतलेले विद्यार्थी - ००० सेवा केलेले विद्यार्थी - ५००
विद्यार्थी म्हणतात...
१) यावर्षी एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा देणे बंधनकारक केले असून, त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन आपली सेवा देणे गरजेचे आहे.
- डॉ. नारायण, अंबाजोगाई.
२) या पूर्वीपासूनच एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांची सेवा देणे बंधनकारक आहे; परंतु काही विद्यार्थी पैसे भरून सवलत घेतात. मात्र, यावर्षी सेवा सर्वांना बंधनकारक करण्यात आली आहे. ही वेळ सेवा देण्याचीच असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमच्याही शिक्षणाचा फायदा रुग्णांसाठी कसा होईल, या दृष्टिकोनातून आम्ही रुग्णसेवा देणार आहोत. डॉ. केतकी मुडेगावकर, अंबाजोगाई.
३) वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेवर शासकीय कोट्यातून वैद्यकीय शिक्षणासाठी नंबर लागतो. अशा विद्यार्थ्यांचा खर्च शासन करते. इतर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात लाखो रुपये डोनेशन घेतले जाते. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठराविक फी व त्यातही सवलत मिळते. ज्या शासनाने आम्हाला डॉक्टर केले त्या शासनाच्या मदतीसाठी धावून जाण्याची हीच वेळ आहे.
डॉ. परमेश्वर पवार, अंबाजोगाई.