पुरुषोत्तम करवा
माजलगाव : शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी शिकवली जात असताना विद्यार्थ्यांना अदयाप पुस्तके न मिळाल्याने आपल्याला काय शिकवले जात आहे, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नसल्याच्या तक्रारी पालक करत आहेत. शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असून, पुस्तके येऊनही वाटपास टाळाटाळ केली जात आहे.
शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मागील अनेक वर्षांपासून पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांची सोय केली होती. दरवर्षी ही पुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळेकडे पाठवण्यात येत असत. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असून, जवळपास सर्वच शाळांनी ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था केली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी पुस्तके लवकर येऊन विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून पुस्तके वाटप केली होती.
यावर्षी शासनाने शाळा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला. यावर्षी शासन मोफत पुस्तके देईल की नाही, असे शिक्षण विभागाला वाटत असताना यावेळीदेखील पुस्तके वेळेवर आली. परंतु शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे आलेली पुस्तके अद्याप वाटप करण्यात आलेली नाहीत. सर्व शाळांनी पहिलीपासून ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू होऊन दीड महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना पुस्तके न मिळाल्याने या विद्यार्थ्यांना विनापुस्तकाचे शिक्षण घेण्याची वेळ आली. त्यांच्याजवळ पुस्तक नसल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षक काय शिकवत आहेत, हे समजेनासे झाले आहे. यामुळे आलेली पुस्तके तत्काळ वाटप करावीत, अशी मागणी एसएफएसआयचे माजी राज्य उपाध्यक्ष शिवाजी कुरे यांनी केली आहे.
--------
विद्यार्थ्यांना पुस्तके नसल्याने शिक्षक ऑनलाईन काय शिकवत आहेत, हे त्यांना कळेनासे झाले आहे. यामुळे ऑनलाईन शिकवून फायदाच नसल्याने पुस्तके तत्काळ वाटप करावीत.
----गणेश लोहिया, पालक
-------
माजलगाव तालुक्यात जिल्हा परिषद व अनुदानित संस्था मिळून २७५ एवढ्या शाळा असून, यात जवळपास ३४ हजार विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जाते. यावर्षी गेल्या वर्षीची पुस्तके जमा करून तीदेखील मुलांना देण्यात येणार आहेत. ही जुनी पुस्तके २० टक्के वाटप करण्यात येणार असल्याने यावर्षी ८० टक्केच पुस्तके मिळालेली आहेत. यावर्षी १ लाख ९८ हजार पुस्तकांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती या विभागाचे प्रमुख आर. एम. अदमाने व एम. व्ही. कदम यांनी दिली आहे.
------
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून गेल्या वर्षीची पुस्तके संकलित करण्यात आली आहेत. नवीन दोन विषयांची पुस्तके आलेली नसल्याने आम्ही पुस्तके वाटप केली नव्हती. ती पुस्तके या आठवड्यात मिळतील. त्यानंतर सर्व पुस्तके वाटप करण्यात येतील.
-एल. बी. बेडसकर, गटशिक्षणाधिकारी, माजलगाव