अर्ज भरून दोन वर्षे उलटली
अंबाजोगाई : राज्यातील पोलीस निरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, विक्रीकर अधिकारी या जागांसाठी २०१९मध्ये शासनाने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकडून अर्ज मागितले होते. जवळपास ८०६ जागांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. परंतु दोन वर्षे उलटूनही परीक्षा झालेली नाही.
परंतु यावर्षी परीक्षा होईल की नाही? का त्या पुन्हा रद्द होतील. याबाबत विद्यार्थ्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीसाठी विद्यार्थी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. अर्ज भरण्यासाठी विविध कागदपत्रे तयार करून अर्जाचे शुल्कही विद्यार्थ्यांनी भरले आहे. मात्र, येत्या ४ सप्टेंबर रोजी या पदांसाठीच्या परीक्षा होणार असल्याचे शासनामार्फत सांगण्यात येत आहे. परीक्षा रद्द करून शासन विद्यार्थ्यांची
फसवणूक करीत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या शासनाच्या तुघलकी धोरणामुळे विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून प्रतीक्षाच करावी लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शहरात जाऊन स्पर्धा परीक्षा शिकवणी वर्गात अभ्यास करीत आहेत, तर कुठे गावागावात वाचनालयात गरीब विद्यार्थी परीक्षेची तयारी करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले खरे; परंतु परीक्षाच होत नसल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे.
बीड जिल्ह्यातही अनेक विद्यार्थ्यांनी विविध पदांसाठी अर्ज केलेला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी औरंगाबाद तसेच पुणे येथे जाऊन महागडे शिकवणीवर्ग लावून अभ्यास करीत आहेत. मात्र, परीक्षेबाबतची निश्चितता दिसून येत नसल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होत चालला आहे. शासनाने तत्काळ परीक्षा घ्यावी आणि ४ सप्टेंबर रोजी संबंधित जागांबाबतची परीक्षा निश्चित करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
स्पर्धा परीक्षा रखडत चालल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होऊ लागले आहे. तसेच दोन वर्षे परीक्षा न झाल्याने त्यांचे वय वाढत चालले आहे. अशीच स्थिती राहिली तर अनेकांना वाढत्या वयानुसार पुढील परीक्षाही देता येणार नाही. यासाठी शासनाने या परीक्षांसाठी वयाची मर्यादा वाढवावी.
-रवींद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते, अंबाजोगाई.