माजलगाव (जि. बीड) : अवैध वाळू उपसा करणारी गाडी चालू देण्यासाठी ६५ हजार रुपयांची लाच घेताना माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यास चालक लक्ष्मण तात्यासाहेब काळे सह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करण्यात येतो. यासाठी अधिकाऱ्यांना हप्ते द्यावे लागतात, अशी चर्चा सर्रास करण्यात येते. गुरुवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी वाळूची गाडी चालू ठेवण्यासाठी ६५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची रक्कम गायकवाड याचा गाडीचालक लक्ष्मण तात्यासाहेब काळेकडे तक्रारदाराने देताना माजलगावातील संभाजी चौकात एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीतून वाळूचा अवैधरीत्या उपसा मोठ्या प्रमाणावर होतो. यास वाळू माफियास पाठबळ देण्याचे काम अधिकारी करत असतात.
गोदावरी नदीच्या पलीकडे जालना जिल्ह्याची हद्द सुरू होते. दोन्ही भागातून वाळूचा मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या उपसा होतो. हा अवैध उपसा होऊ द्यावा यासाठी वाळू माफिया हे अधिकाऱ्यांना लाच देऊन स्वत:चे उखळ पांढरे करतात. यात सर्वांची मिलीभगत असल्याचेही वारंवार समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड व चालक लक्ष्मण तात्यासाहेब काळे यांना पुढील कार्यवाहीसाठी बीड येथे नेण्यात आले होते. शुक्रवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हर्ज करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती ए. एस. वाघमारे यांनी यांनी दोघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सलग दुसऱ्या दिवशी बडा अधिकारी पकडलाबीड व पाटोदा पंचायत समितीचे बीडीओ नारायण मिसाळ यांनी पाटोदा तालुक्यातील सार्वजनिक विहिरीचे देयक अदा करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. बीड येथील राहत्या घरी ३७ हजारांची लाच घेताना बीड एसीबीने बुधवारी रंगेहात पकडले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी चालकामार्फत ६५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आला. या दोन घटनेमुळे बीड जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.