माजलगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करू देण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाच द्यावी लागते. लाच देऊनही हे अधिकारी अधिकच्या पैशासाठी गाड्या पकडतात. यातूनच अवैध वाळूचा पुरवठा करणाऱ्या एका राजकीय पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्याने उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड याच्या लाचखोरीची तक्रार औरंगाबाद एसीबी कार्यालयाकडे दिली होती. या तक्रारीची शहनिशा करून जालना एसीबीच्या पथकाने श्रीकांत गायकवाड यास चालकामार्फत ६५ हजार रुपयांची लाच घेताना माजलगाव शहरातील संभाजी चौकात गुरुवारी रात्री ९ वाजता रंगेहात पकडण्यात आले. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने जेवण करीत असताना गायकवाड यांना ताब्यात घेत बीड येथील एसीबीच्या कार्यालयात आणले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात येत होती. शुक्रवारी दुपारी ३ वाजता दोघांना माजलगाव येथे आणत न्यायालयात दाखल केले. तेव्हा न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चौकट
तरुण अधिकारी लाचेच्या आहारी
बीड जिल्हा प्रशासनातील महत्त्वाच्या दोन अधिकाऱ्यांना बीड व जालना येथील एसीबीच्या पथकाने ३५ व ६५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. पकडण्यात आलेले दोन्ही अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमधून निवडलेले आहेत. दोघांचे वय ३० ते ३५ दरम्यान आहे. दोन्ही तरुण अधिकाऱ्यांना प्रशासनात आल्यानंतर लाच घेण्याची सवय लागली असल्याची चर्चा दिवसभर बीड जिल्हा प्रशासनात करण्यात येत होती.