माजलगाव : तालुक्यातील दिंद्रुड येथील तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून एका माजी सैनिकास शासकीय जमिनीवरील प्लॉट विकला. दरम्यान, ही बाब उघड झाल्याने हैराण झालेल्या माजी सैनिकाने आपल्या दिव्यांग मुलांना सोबत घेत कुटुंबासह पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले. दरम्यान, उपोषणकर्त्या माजी सैनिकाची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
१५ ऑक्टोबर २०१८ रोजी दिंद्रुड येथील ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत कार्यरत ग्रामसेवक राजकुमार झगडे, उपसरपंच युवराज ठोंबरे व गणपत ठोंबरे यांनी येथील गट नंबर ७१४ मध्ये कुठलाही वारस नसणारा शासकीय प्लॉट विक्री केला. या वेळी बनावट दस्तावेज तयार करून जागेचा बांधकाम परवाना गणपत ठोंबरे यांच्या नावे असल्याचा देखावा केला.
दरम्यान, माजी सैनिक असणाऱ्या सुरेश मुंडे यांच्या पत्नी सुमन मुंडे यांना त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत हा प्लॉट ग्रामसेवक झगडे व उपसरपंच ठोंबरे यांनी विक्री केला. कालांतराने शासकीय कामासाठी प्लॉटची खरी व प्रमाणित कागदपत्रे लागत असल्याने सुरेश मुंडे हे पीटीआर काढण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये गेले असता हा प्लॉट शासकीय असल्याची बाब उघड झाली. या वेळी त्यांनी संबंधित उपसरपंच युवराज ठोंबरे, ग्रामसेवक झगडे यांना याचा जाब विचारला असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली व नंतर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी माजी सैनिक मुंडे यांनी बीडपासून अनेक कार्यालयांसमोर उपोषण केले आहे. कुठेच दाद मिळाली नाही. अखेर माजी सैनिक मुंडे यांनी आपल्या अपंग मुलांना सोबत घेत पंचायत कार्यालयासमोर कुटुंबासह सोमवारी उपोषण सुरू केले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे मुंडे यांची प्रकृती बिघडल्याने या वेळी प्रशासनाची मोठी धांदल उडाली.
मुंडे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून माझा प्लॉट माझ्या नावे करा, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोरच आपला जीव देणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
सदरील उपोषण प्रकरणात संबंधित ग्रामसेवक यांच्याकडे खुलासा मागवला असून मोजणीसाठी भूमी अभिलेखला कळवण्यात आले असून एक महिन्यात मोजणी करून हे प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
- प्रज्ञा माने भोसले,
गटविकास अधिकारी, माजलगाव
(फोटो : उपोषण करताना माजी सैनिकाची प्रकृती बिघडली असताना घाबरलेली पत्नी.)