भाजीपाला, फळबागांत वाढ : मानवलोक, पाणी फाउंडेशनकडून आढावा
केज (जि. बीड) : सत्यमेव जयते वॉटरकपनंतर झालेले परिवर्तन पाहण्यासाठी मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी बनसारोळा, आवसगाव, सावळेश्वर, पाथरा गावांना भेटी दिल्या. पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या क्रांतीमध्ये भाजीपाला लागवड, फळबाग लागवड वाढत असून, ही आनंदाची बाब असल्याचे मत लोहिया यांनी व्यक्त केले.
त्याचबरोबर दुसरीकडे उपलब्ध झालेल्या पाणी वापराबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. लोहिया म्हणाले की, फळबागांची मूल्य साखळी निर्माण व्हावी यासाठी मानवलोकच्या सहकार्यातून येणाऱ्या काळात प्रयत्न केले जाणार आहेत. समृद्ध गाव स्पर्धेत काम करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसह गावातील विकासात हातभार लावावा.
माती, गवत, झाडे, जलसंधारण कामे व जलव्यवस्थापन करून शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन पाणी फाउंडेशन समन्वयक संतोष शिनगारे यांनी केले. यावेळी लोहिया व शिनगारे यांनी सावळेश्वर येथे सुरू असणाऱ्या विहीर पाणी पातळी मोजमापाच्या ठिकाणी भेट देऊन प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. पाणी फाउंडेशनच्या वतीने प्रवीण काथवटे व शिवलेश्वर मेदने यांनी आभार मानले.
उसाच्या आहे त्या क्षेत्रावर उतारा वाढवा
उसाचे क्षेत्र वाढताना दिसून आले. उसाचे क्षेत्र वाढवण्यापेक्षा आहे त्या क्षेत्रावर उसाचा शंभर टनांपेक्षा जास्त उतारा एकरी काढावा, असा सल्ला अनिकेत लोहिया यांनी दिला. शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाला क्षेत्र वाढवावे, असे आवाहनही त्यांनी केले.