माजलगाव : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील हे मागील एक ते दीड महिन्याच्या कार्यकाळात कार्यालयातच आढळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कोरोनासारख्या आपत्कालीन परिस्थितीत शहरात एकदाही रस्त्यावर पाटील हे दिसून आले नाहीत. एवढेच नव्हे तर नागरिकांना विविध कामे घेऊन जावे लागत असताना ते भेटत तर नाहीतच; परंतु त्यांचा मोबाईलदेखील ते घेत नसल्याने नागरिकांवर खेटे मारण्याची वेळ आली आहे.
येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वी पदाचा पदभार स्वीकारला होता. त्या वेळेपासून उपविभागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले आहे. शहरात राजरोस वाहन चोरीच्या घटना सुरू असताना त्यांचा तपास लावण्यात किंवा अंकुश ठेवण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी निष्क्रिय ठरले आहेत.
मागील एक-दीड महिन्याच्या कार्यकाळात कोरोनाने थैमान घातले असताना पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आपल्या जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करत आहेत, असे असताना सुरेश पाटील एकदाही रस्त्यावर दिसून आलेले नाहीत. विशेष म्हणजे ते कार्यालयातदेखील जास्त येत नसल्याचे या कार्यालयात जाणाऱ्यांना सांगण्यात येते. यामुळे नागरिकांसोबतच या विभागाच्या कर्मचाऱ्यांची विविध कामे खोळंबली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पाटील यांची निष्क्रियता बघून तीन-चार वर्षांपूर्वी याच पदावर कार्यरत असलेल्या आयपीएस भाग्यश्री नवटक्के यांची सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गाजलेली कारकीर्द नागरिकांना व पोलीस कर्मचाऱ्यांना आठवणीत येत आहे.