लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जवळपास ६२५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात १४४ कोटी १८ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असून, बँकेकडे वर्ग करण्यात आले आहे. तर दुस-या टप्प्यात ३१५ कोटी ७ लक्ष ४५ हजार रुपये इतके अनुदान जिल्ह्यास प्राप्त झाले आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळणार आहे. परंतु, पहिल्या टप्प्यातील अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जवळपास ७ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये महत्त्वाचे सोयाबीन, कापूस, बाजरी, कडधान्य ही पिके हातची गेली होती. मागील दोन वर्षात सलग दुष्काळी परिस्थिती आणि खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे बळीराजा हतबल झाला होता. त्यामुळे शासनाकडून तात्काळ अतिवृष्टीबाधित शेतक-यांना अनुदान द्यावे अशी मागणी केली जात होता. दरम्यान या परिस्थितीचा आढावा केंद्राच्या पथकाने तसेच कृषी, विभागीय आयुक्तांनी व संबंधित अधिका-यांनी घेतला होता. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करुन तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अतिवृष्टीबाधित शेतक-यांच्या अनुदानासाठी ६२५ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली होती.या मागणीनुसार पहिल्या टप्प्यात १४४ कोटी १८ लक्ष रुपयांचे अनुदान जिल्ह्यात प्राप्त झाले आहे. त्याचे वाटप बँकेच्या माध्यमातून सरु आहे. परंतु, पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त होऊन एक महिना होत आहे. अजूनही अनेक पात्र शेतक-यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. तालुकास्तरावरून शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याचे अहवाल जिल्हा प्रशासनाकडे आले आहे. मात्र, बँकेकडून ही अनुदानाची रक्कम अजूनही शेतक-यांना दिलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बँक दिलेल्या वेळेत शेतक-यांपर्यंत अनुदानाची रक्कम पोहोचवत नसेल तर बँकेवर कारवाई करावी अशी मागणी शेतक-यांमधून होत आहे.अनुदान वाटपाचे काम हे प्रामुख्याने जिल्हा बँके कडे आहे. यापुर्वीचे देखील अनेक अनुदानाच्या व विम्याच्या रकमा याच बँकेतून शेतक-याच्या खात्यावर गेल्या आहेत.मात्र, अनुदानाची रक्कम बँकेत येऊन देखील ती वाटप केली जात नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले होते.त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी अनुदानाची रक्कम जर वेळेत शेतक-यांना मिळाली नाही व ती वाटपाअभावी बँकेत पडून राहिली तर अपहार केल्याचा ठपका ठेऊन कारवाई करण्याचा इशारा दिला होता.बँकेकडे पहिल्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम वर्ग होऊन १ महिना होत आहे. त्यामुळे वंचित असलेल्या शेतक-यांनी प्रशासनाकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुलदीप करपे यांनी केले आहे.
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दुस-या टप्प्यात ३१५ कोटींचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:48 AM