मागील दोनशे वर्षांपासून बाराखांबी परिसरात लिंगायत समाजाची स्मशानभूमी आहे. महसूल विभागाने दोन एकर जागा स्मशानभूमीसाठी दिली आहे. लिंगायत समाजात अंत्यविधी वेळी पार्थिवाचे दफन करण्यात येते . त्यामुळे मोठ्या जागेची गरज भासते. वाढती लोकसंख्या पाहता आणखी पाच एकर जागेची मागणी समाजाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.
लिंगायत स्मशानभूमीकडे जाणारा कच्चा रस्ता अतिशय खराब झाला होता. त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले होते. हा रस्ता दुरुस्तीची मागणी बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद पोखरकर व समाजबांधवांनी आमदार नमिता मुंदडा यांच्या यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती. बाराखांबी मंदिराच्या परिसरात पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खनन करण्यात आले. तेथे अनेक देवतांच्या आकर्षक कोरीव दगडी मूर्ती सापडल्या.
पत्र्याच्या शेडमध्ये ह्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. त्या पाहण्यासाठी पर्यटकही मोठ्या प्रमाणात बाहेरगावाहून येतात. तेथील स्मशानभूमीचा रस्ता तयार झाल्यानंतर पर्यटकांना रस्त्याचा लाभ मिळणार आहे. या रस्त्यासाठी भरीव निधी दिल्याबद्दल महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ . निशिकांत पाचेगावकर यांनी आमदार नमिता मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा यांचे आभार मानले.