माजलगाव : मंगळवारी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत माजलगाव मतदारसंघातील विविध सिंचन प्रकल्पांसाठी भरीव निधी देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी जायकवाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची वहनक्षमता सुरुवातीच्या क्षेत्रात २२५० क्युसेस तर शेवटच्या क्षेत्रात ११५० क्युसेस करण्यासाठी कॅनाॅल व वितरिका दुरुस्तीसाठी ७०० कोटी रु.चा डीपीआर तयार करून गोदावरी महामंडळाने मान्यता देण्यासाठी शासनास २ महिन्यांत प्रस्ताव सादर करावा. माजलगाव धरणाच्या कॅनाॅल व वितरिका पुनर्स्थापना व दुरुस्तीसाठी १ कोटी ७० लक्ष रुपयांची मान्यता तसेच माजलगाव धरणाच्या कालवा व वितरिकेच्या बाजूने रस्त्यांची दुरुस्ती एमआरईजीएसअंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला. ढालेगाव, रोषणपुरी, तारूगव्हाण, लोणी सावंगी (सादोळा), बॅरेजेसमुळे बाधित जमिनीचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना मावेजा देणे, सिंदफना नदीवरील मंजरथ व माजलगाव शहरालगत नदीवर पुलाचे बांधकाम करणे, लोणी सावंगी उपसायोजना जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात देण्यात येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. आरणवाडी व रेपेवाडी साठवण तलावाचे काम जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
धारूर व वडवणी तालुक्यातील विविध साठवण तलाव कामासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र घेऊन गोदावरी महामंडळाने मान्यतेसाठी शासनास सादर करावे, कुंडलिका प्रकल्पातून तेलगाव व नित्रुड लाभक्षेत्रात कॅनाॅलऐवजी बंद पाइपलाइनद्वारे पाणी देण्यासाठी ५४ लक्ष रुपयांच्या कामास महामंडळाने मान्यता द्यावी. माजलगाव धरणातून चिंचाळा, देवडी, चिंचवडगाव, ह. पिंप्री, पिंपरखेड, तिगाव, साळिंबा या गावासाठी ५८०० हे. उपसा जलसिंचन योजना प्रस्ताव गोदावरी महामंडळाने तयार करून एक महिन्यात मान्यतेसाठी सादर करावा, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीस आ. प्रकाशदादा सोळंके, सचिव (जलसंपदा), सचिव (लाभक्षेत्र), कार्यकारी संचालक (गोदावरीत महामंडळ, औरंगाबाद), मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, संबंधित कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
===Photopath===
070421\purusttam karva_img-20210407-wa0020_14.jpg