लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड शहरातील एका उपकेंद्राचे रीले जळाल्याने अर्ध्या बीड शहरातील वीज तब्बल १२ तास गायब होती. वीज नसल्याने सर्वच शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले होते. तसेच ग्राहकांमधूनही तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. दुपारी चार वाजेनंतर वीज पुरवठा सुरळीत केल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.बीड शहरात सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. याचदरम्यान, अंकुशनगर भागात वीज कोसळली. त्यामुळे धानोरा रोडवरील उपकेंद्रातील रीले जळाले.मंगळवारी पहाटेच्या चार वाजेच्या सुमारास वीज गायब झाली. त्यानंतर महावितरणकडून दिवसभर दुरूस्तीचे काम सुरू होते. दुपारनंतर चार वाजता सुरळीत वीजपुरवठा सुरू झाल्याचे महावितरण अभियंता हळदे यांनी सांगितले.दरम्यान, नगर रोड परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रूग्णालयासह इतर अनेक शासकीय कार्यालये आहेत. मंगळवारी दिवसभर वीज नसल्याने सर्व कामकाज ठप्प झाले होते. तसेच व्यापारी, व्यावसायीक व ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पाऊस आल्यानंतर वीज गायब होण्याचे प्रकार नित्याचेच असून यावर उपाययोजना करण्यास महावितरण अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे. सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
उपकेंद्राचे रिले जळाले; १२ तास वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:54 AM