बीड, दि. ९ : परळी तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीची मतमोजनी सोमवारी सकाळी 10 वाजता येथील तहसील कार्यालयात सुरू करण्यात आली. दुपारी सव्वाएक पर्यंत 40 ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले. या निकालावरून राष्ट्रवादी व भाजपच्या प्रसाथापितांना आपली गड राखण्यात यश आल्याचे दिसत आहे.
आज मतमोजणीच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होती. निकाल जाहीर होईपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता ताणलेली होती. परळीचे तहसीलदार शरद झाडगे, गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर निकाल जाहिर करणे सुरू होते. धर्मापुरी, पांगरी, दाऊतपुर, लमाणतांडा परळी, चांदापूर, नंदागौळ, तळेगाव ग्रामपंचायत सरपंच पद धनंजय मुंडे समर्थकांच्या ताब्यात गेली. तर अस्वलांबा,बेलंबा, पिंपगाव गाढे,कौडगाव साबळा, कासारवाडी/रामेवाडी, नागदरा, खोडवा सावरगाव, पाडोळी/हसनाबाद, वाका, तडोळी, कन्हेरवाडी, जिरेवाडी, इंजेगाव, हाळम, डाबी ग्रामपंचायत सरपंच पद पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडे राहिली. पांगरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व. मांडेखेल ग्रामपंचायत पुन्हा कॉंग्रेसच्याच ताब्यात.
दुपारी 1 पर्यंत परळी तालुक्यातील बोरखेड,अस्वलांबा, बेलंबा, चांदापूर, गोवर्धन, कौडगाव साबळा, दौंडवाडी, जयगाव, तळेगाव, कासारवाडी, नागदरा, कौडगाव हुडा, पिंपळगाव गाढे, सावरगाव खोडवा, पाडोळी/हसनाबाद, वाका, तडोळी, कौठळी, मांडेखेल, धर्मापुरी, पोहनेर, कन्हेरवाडी, जिरेवाडी, लमाणतांडा परळी, नंदागौळ, टाकळी देशमुख, लोणी, बोधेगाव, आचार्य टाकळी, इंजेगाव, दौनापुर, हाळम, करेवाडी, दैठणाघाट, लोणारवाडी, नागपिंपरी, लिंबुटा, वडगाव दादाहरी, वाघबेट, मांडवा या गावचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. अजूनही मत मोजणी सुरु आहे. अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली धर्मापुरी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. गोविंद फड यांच्या पॅनलला दणदणीत यश प्राप्त झाले. रा.कॉ.च्या अश्विनी गोविंद फड या सरपंच पदाच्या उमेदवार होत्या. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवाराचा दारून पराभव केला. अश्विनी गोविंद फड यांना 2435 मते तर प्रतिस्पर्धी गंगाबाई रोकडोबा फड भाजपा यांना 1147 मते मिळाली. निकाल जाहिर होताच तहसील कार्यालयात ऍड. गोविंद फड समर्थक व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली. घोषणा देत अनेक कार्यकर्ते पाटबंधारे कार्यालया पर्यंत आले. तेथून ऍड. गोविंद फड यांची मिरवणूक तहसील कार्यालया पर्यंत काढण्यात आली. भाजपाच्या ताब्यातून ग्रामपंचायत हिसकावून घेण्यात राष्ट्रवादी कॉंग्रसला यश आले आहे.
कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे यांच्या पत्नी शिवशालाबाई या विजयी झाल्या आहेत. त्यांनी भिमराव मुंडे यांचा पराभव केला व मांडेखेलची ग्रामपंचायत कॉंग्रेसच्या ताब्यात पुन्हा एकदा आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून मांडेखेल ग्रामपंचायतीवर प्रा.टी.पी. मुंडे यांच्या गटाची वर्चस्व राहिले आहे. कन्हेरवाडीत रा.स.प.युवक प्रदेश अध्यक्ष राजेभाऊ फड हे विजयी झाले आहेत. राजेभाऊ फड यांना 1503 मते तर माणिक हरिश्चंद्र फड यांना 1284 मते पडली. तर बालाजी लक्ष्मण फड यांना 278 मते पडली. रा.कॉं.चे माजी तालुकाध्यक्ष माणिक फड यांचा रासप, भाजप प्रणित पॅनलने पराभव केला. नंदागौळ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सरपंच पदासाठी रा.कॉं.च्या पल्लवी सुंदर गित्ते या उभ्या होत्या त्यांनी 1278 मते मिळवून सोनाली संदिप गित्ते यांचा पराभव केला आहे.
पांगरी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत रा.कॉं.च्या अक्षदा सुशिल कराड ह्या विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी मंदाकिनी मोहन मुंडे व जयश्री तिडके यांना पराभवाला सामोरे जावे लागले. रा.कॉं. चे नेते माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड यांच्या अक्षदा कराड या सुन आहेत. पांगरी ग्रामपंचायत रा.कॉं. च्या ताब्यात आली आहे.
दाऊतपुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कौशल्या श्रीकांत फड या विजयी झाल्या आहेत. तर अस्वलांबा च्या सरपंच पदी भाजपा सत्यशिला जिवराज ढाकणे या निवडून आल्या आहेत. बेलंबा ग्रामपंचायत निवडणूकीत इंदूबाई दिनकर गित्ते या विजयी झाल्या आहेत. त्यांनी सिताबाई डापकर यांचा पराभव केला. इंदूबाई गित्ते ह्या पुणे महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त किरणकुमार गित्ते यांच्या मातोश्री आहेत. किशोर गित्ते व इतरांच्या नेतृत्वाखाली पॅनलला विजय प्राप्त झाला.
लमाणतांडा परळी च्या सरपंच पदी दत्ता सखाराम राठोड हे विजयी झाले. दत्ता राठोड हे रा.कॉं. चे कार्यकर्ते असून त्यांनी प्रतिस्पर्धी मधुकर भांगे यांचा पराभव केला आहे. खोडवा सावरगावच्या सरपंच पदी भाजपच्या उर्मीला अरूण दहिफळे या निवडून आल्या आहेत. तर हाळम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीत विनायक शंकरराव गुट्टे हे निवडणून आले आहेत. भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे यांचे ते भाऊ आहेत.
तहसील कार्यालयात पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या निकाल घोषीत करण्यापुर्वी त्या गावच्या उमेदवार प्रतिनिधींना रांगेत उभे टाकून तहसील कार्यालयात सोडण्यात येत होते. प्रत्येकाची तपासणी केली जात होती. अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, परळी शहरचे पोलीस निरीक्षक हेमंत मानकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शांततेत मतमोजनीची प्रक्र्रिया चालू होती.
तळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रा.कॉं.च्या वंदना सुभाष मुंडे ह्या विजयी झाल्या आहेत. तर शांताबाई मंडे यांना याठिकाणी पराभव पत्कारावा लागला. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व रा.कॉं.चे कार्यकर्ते सुर्यभान मुंडे यांच्या ताब्यात तळेगावची ग्रामपंचायत आली आहे. तर इंजेगावच्या सरपंच पदी भाजप प्रणित पॅनलच्या मंगला विनायक फड या विजयी झाल्या आहेत. चांदापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रा.कॉं.चे कार्यकर्ते श्रीहरी गित्ते यांच्या पॅनलच्या भामा किसन हानवते या विजयी झाल्या आहेत.
परळी तालुक्यातील अस्वलांबा,बेलंबा, पिंपगाव गाढे,कौडगाव साबळा, कासारवाडी/रामेवाडी, नागदरा, खोडवा सावरगाव, पाडोळी/हसनाबाद, वाका, तडोळी, कन्हेरवाडी, जिरेवाडी, इंजेगाव, हाळम, डाबी या ग्रामपंचायती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचा विजय झाला आहे. बहुतांशी ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा लागला असल्याचा दावा भाजपच्या तालुका कार्यकरणीच्या वतीने करण्यात आला आहे.