परळी : विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी काढलेल्या धडक मोर्चा आणि ७ तासांच्या ठिय्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनच्या पीक विम्याचे पैसे ३ दिवसात देण्याचे तसेच वैद्यनाथ कारखान्याकडील ऊस गाळपाची बिले २५ आॅगस्टपर्यंत देण्याचे प्रशासनाने लेखी आश्वासन दिले आहे. प्रशासनाने मोर्चा व आंदोलनाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ७ तासांचे भर पावसातील हे आंदोलन मागे घेण्यात आले.सोयाबीनचा पीक विमा, वैद्यनाथ कारखान्याकडील बिले यासह १४ मागण्यांच्या संदर्भात धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देत धनंजय मुंडेंसह हजारो शेतकरी भर पावसात ७ तास बसून राहिले. त्यामुळे धास्तावलेल्या प्रशासनाने तातडीने पावले उचलीत सर्व संबंधित विभागांकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मागवला. रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार पाटील, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी तपकिरे, कृषी विभागाचे अधिकारी यांनी सर्व मागण्या मान्य करीत असल्याबाबत लेखी पत्र दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.लेखी दिलेल्या पत्रामध्ये सोयाबीन पीक विम्याबाबत प्रत्येक अर्जाची छाननी करुन सदर पीक विम्याचे वाटप येत्या ३ दिवसात करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. वैद्यनाथ कारखान्याकडील ऊस गाळपाची बिले २५ आॅगस्टपर्यंत अदा करण्याचे कारखान्याने कळविले आहे. दुबार पेरणीबाबत तलाठी व कृषी सहाय्यक यांना संयुक्तपणे स्थळ पाहणी करुन १० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. जिरायत व फळबाग अनुदान रक्कम शेतकºयांच्या खात्यात तातडीने जमा करण्यात येईल, परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम ३ महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील, परळी बायपास रस्त्याचे काम वार्षिक आराखडा २०१९ मध्ये समावेश करून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पूर्ण केले जाईल. पाणी उपलब्ध होताच परळी औष्णिक विद्युत केंद्र सुरू केले जाईल. विद्युत मंडळाने दिलेल्या चुकीच्या बिलांची दुरुस्ती करून दिली जाईल. वीजेच्या तक्रारी दूर करीत चांदापूर प्रकल्पावरून परळीस पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. सरसकट कर्जमाफी, कृत्रिम पाऊस, वॉटरग्रीड योजनेत परळी तालुक्यातील प्रकल्पांचा समावेश, खडका धरणातून परळी शहरास पाणीपुरवठा याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने १६ आॅगस्ट रोजी बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले आहेत.मागण्यांना प्रतिसाद दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी प्रशासनाचे आभार मानले. मात्र, लेखी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राष्ट्रवादीच्या ७ तासांच्या ठिय्या आंदोलनास यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:49 PM
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी काढलेल्या धडक मोर्चा आणि ७ तासांच्या ठिय्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.
ठळक मुद्देतीन दिवसांत सोयाबीन पीकविम्याचे पैसे मिळणार : २५ आॅगस्टपर्यंत वैद्यनाथ कारखान्याची ऊस बिले मिळणार